मुंबई : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र सिनियर रेसिडंट डॉक्टर असोसिएशनने (एमएसआरडीए) १८ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या केंद्रीय मार्डने मंगळवारी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये काळ्या फिती बांधून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील ॲलोपॅथी डॉक्टरांच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. आयएमए, एमएसआरडीए या संघटनांनी १८ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे, तर अन्य संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात सोमवारी केंद्रीय आणि बीएमसी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण आयुक्त आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालकांची भेट घेऊन सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक चिकित्सकांची एमएमसीमधील नोंदणी रद्द करण्याची मागणी केली.

या बैठकीनंतर बीएमसी मार्ड, केंद्रीय मार्ड आणि आंतरवासिता वैद्यकीय विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या अस्मि यांनी एकत्रितपणे या निर्णयाचा १६ सप्टेंबर रोजी काळ्या फिती बांधून निषेध केला. त्यानुसार राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, गोंदिया, पुण्यातील बीजेएमसी, केईएम, नायर, कूपर आणि शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून काम केले.

या आंदोलनामुळे वैद्यकीय सेवेत अडथळा येणार नाही, तसेच सर्व आरोग्य सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील याची डॉक्टरांनी काळजी घेतली. हे आंदोलन एमएमसीच्या अनैतिक निर्णयाविरोधात जनजागृती करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पुकारल्याचे मार्डकडून स्पष्ट करण्यात आले.