मुंबईमधील प्रसिद्ध मासिक असलेल्या ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी भायखळा पोलीस स्थानकामध्ये संभाजी भिडे समर्थकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केलेल्या मार्मिकमध्ये काढलेलं एक व्यंगचित्र संभाजी भिडेंशी साधर्म्य साधणारं असल्याचा दावा करत भिडे समर्थकांनी सर्जेराव यांच्याविरोधात ऑनलाइन अपप्रचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> संभाजी भिडेंचा हट्ट, पाठलाग अन् सुधा मूर्तींचं भिडेंच्या पाया पडणं… ‘त्या’ भेटीबद्दल आयोजकांचा धक्कादायक खुलासा

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे हे काही दिवसांपूर्वी मंत्रालयामध्ये एका महिला पत्रकाराशी बोलताना टिकलीच्या विषयावरुन केलेल्या विधानामुळे चर्चेत होते.‘ टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो’ असं महिला पत्रकाराला सांगितल्यानंतर या विषयावरुन बराच वाद निर्माण झाला होता. याच घटनाक्रमानंतर तीन नोव्हेंबर रोजी सर्जेराव यांनी काढलेल्या एका व्यंगचित्रामध्ये भिडेंप्रमाणे दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर मिशांऐवजी आळ्या असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

नक्की पाहा >> Video: …अन् ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई संभाजी भिडेंच्या पाया पडल्या

सर्जेराव यांनी ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर हे व्यंगचित्र शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये, “शेकडो वर्ष काही लोकांच्या मेंदूतील मनुवादी किडे वळवळ करायचे थांबलेले नाहीत. धर्माच्या नावाखाली दुसर्‍यांच्या आयुष्यात दखल देत ते नेहमीचं ढवळाढवळ करत आलेत. या वृत्तीचा निषेध नेहमीच व्हायलाच हवा! या वृत्तीला मुळापासून उखडायला हवं,” असं म्हटलं होतं. सर्जेराव यांनी या व्यंगचित्रावर सोशल मीडियावरुन बऱ्याच प्रतिक्रिया आल्याचं म्हटलं आहे. मात्र मागील आठवड्यापासून माझ्याविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवली जात असल्याचं दिसून आलं असंही सर्जेराव यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> संभाजी भिडेंचं आमदार, खासदारांबद्दल वादग्रस्त विधान; ‘भाडोत्री’ असा उल्लेख करत म्हणाले, “सगळेजण…”

“मी भिडेंचा किंवा इतर कोणाचाही उल्लेख प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रामध्ये केला नव्हता. मागील आठवड्याभरामध्ये मी अनेक अशा पोस्ट पाहिल्या की लोक माझं इन्स्टाग्राम अकाऊंट रिपोर्ट करण्याचं आवाहन करत आहेत. तसेच मला मेसेजही पाठवत आहेत. या असल्या पोस्ट कोण करत आहे हे मी त्यांच्या प्रोफाइलवर जाऊन तपासलं असता त्यापैकी काही प्रोफाइल या १५ ते १६ वर्षांच्या मुलांच्या असल्याचं दिसून आलं. त्यानंतर मला थेट मेसेजमधून धमक्या येऊ लागल्या,” असं सर्जेराव यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

ट्वीटरवरुनही आपला पोलीस स्थानकाबाहेरील फोटो पोस्ट करत सर्जेराव यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती फॉलोअर्सला दिली आहे. सर्जेराव यांनी पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीजचे स्क्रीनशॉट आणि मेसेजच्या स्क्रीनशॉटमध्ये अश्लील शब्दांमध्ये त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचंही दिसत आहे.

या धमक्यांकडे दुर्लक्ष करण्याचं सर्जेराव यांनी आधी ठरलंव होतं. मात्र नंतर एका पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणी तक्रार करण्याचा सल्ला दिल्यानंतर सर्जेराव यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. भायखळा पोलीस स्थानकामध्ये जाऊन सर्जेराव यांनी मंगळवारी तक्रार दाखल केली असून ही तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवण्यात आली आहे.

समाजातील शांतता भंग केल्याच्या कलमांखाली पोलिसांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्या खात्यांवरुन सर्जेराव यांना धमकावण्यात आलं आणि पोस्ट करण्यात आल्या त्याबद्दलची माहिती आम्ही गोळा करत आहोत आणि तपास सुरु आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marmik cartoonist gaurav sarjerao files police complaint after threats over sambhaji bhide caricature police book two people scsg
First published on: 17-11-2022 at 15:04 IST