लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी पहाटे ४.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले.
वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोड क्रमांक ३३ येथील क्रोमाच्या मोठ्या दुकानात भीषण आग लागली. मॉल स्वरूपाचे हे दुकान असून जमिनीखाली ३ तळमजले आणि वर तीन मजले अशा स्वरूपाचा हा मॉल असून आग तळमजल्यावर लागली होती. मात्र काही वेळाने ही आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली.
आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल, विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मुंबई पोलीस, अदानी इलेक्ट्रिक वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथकचे पथक पोहोचले आणि त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. मॉल लगतची इमारत सुरक्षिततेच्या कारणास्तव अग्निशमन दलाने रिकामी केली.
सुरुवातीला अग्निशमन दलाने एक क्रमांकाची वर्दी दिली होती. मात्र परिस्थिती गंभीर होत गेल्याने अवघ्या काही मिनिटांतच आगीचा स्तर १, २, ३ आणि ४ पर्यंत गेल्याचे अग्निशमन दलाने सकाळी ६.१५ वाजता घोषित केले. आग आटोक्यात आणण्यासाठी १२ मोटर पंपांसह तीन छोटी होज लाईन्स वापरण्यात येत आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंम्बुलगेकर, उप मुख्य अधिकारी, विभागीय अधिकारी, अतिरिक्त विभागीय अधिकारी, वरिष्ठ स्टेशन अधिकारी, स्टेशन अधिकारी तसेच १३ फायर इंजिन्स, ८ जंबो टँकर, २ रोबोट फायर फायटर्स, रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन सेवा पोहोचल्या आहेत.
मुंबई अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाच्या विनंतीनुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक सकाळी ७.४५ वाजता घटनास्थळी दाखल झाले.