मुंबई : बोरिवली येथील कोरा केंद्र मार्गावरील दत्तानी टॉवरमधील एका सदनिकेत शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
दत्तानी टॉवर या १२ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील सदनिका क्रमांक ७३ मध्ये आग लागली होती. घरातून धुर येत असल्याचे लक्षात येताच इमारतीमधील अन्य रहिवाशांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. धुरामुळे अग्निशामकांना आग विझवण्यात अडथळे येत होते. तसेच, या आगीत विद्युत तारा, विद्युत यंत्रणा, लाकडी फर्निचर, वातानुकूलित यंत्रणा, दारे, खिडक्या तसेच घरगुती अन्य सामान जाळून खाक झाले.
सुमारे १२०० चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत दुपारी ३.१९ च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.