मुंबईः सर जे.जे. रुग्णालयातील वसतिगृहातील खोलीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन रविवारी रात्री आत्महत्या केली. घरातील आर्थिक अडचणी व अभ्यासाच्या तणावातून त्याने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

रोहन रामफेर प्रजापती(२२) असे तरूणाचे नाव आहे. तो सर जे.जे. मार्ग रुग्णालयाच्या आवारातील अपना बॉईज वसतिगृहातील खोली क्रमांक १९८ मध्ये रहायचा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) तिसऱ्या वर्षांत तो शिक्षण घेत होता. त्याने राहत्या खोलीतील पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.

सध्या परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्यामुळे काही विद्यार्थी हे आपल्या घरी गेले आहेत, त्यामुळे वसतिगृहामध्ये फारशी वर्दळ नाही. रविववारी रोहन प्रजपती याने महाविद्यालयातील आपल्या एका सहकाऱ्याला फोन करून वसतिगृहाच्या त्याच्या खोलीमध्ये कोणी आहे का याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर आतून खोली बंद करून त्याने गळफास लावून घेतला. काही वेळाने त्याचे मित्र खोलीजवळ आल्यावर रोहन दार उघडत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले. त्यावेळी रोहन याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तातडीने दरवाजा उघडत रोहनला सीपीआर देऊन आपत्कालीन विभागात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून प्रजापती याला मृत घोषित केले.

याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यासोबत शिकणाऱ्या व वसतिगृहात राहणाऱ्या मुलांकडून घटनाची माहिती घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कुटुंबियांची आर्थिक अडचण व शिक्षणातील अडचणीमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहन याने नीट यूजी परीक्षेमध्ये भारतात ३१५५ रँक मिळवली होती. तो अभ्यासात हुशार होता. अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.