मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) भोपाळमधील हुजूर तालुक्यातील जगदीशपूर भागात चालणाऱ्या कारखान्यातून ६१ किलो २०० ग्रॅम मेफेड्रोन (द्रव स्वरूपात) जप्त करण्यात आला. काळ्या बाजारात त्याची किंमत ९२ कोटी रुपये आहे. या कारखान्यामागिल सूत्रधार सलिम डोला असून त्याचे कुख्यात दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले. या कारखान्यासाठी सूरत व मुंबईतून हवाला मार्फत पैसे जात होते. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

डीआरआयने ऑपरेशन क्रिस्टल ब्रेक नावाने विशेष मोहिम राबवून भोपाळ मेफेड्रोन (एमडी) केली. या कारवाईत मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करून सात जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनूसार, १६ ऑगस्टला भोपाळ जिल्ह्यातील हुजूरमधील जावदिशपूर (इस्लामनगर) येथे कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ६१ किलो २०० ग्रॅम द्रव स्वरूपातील एमडी जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ९२ कोटी रुपये आहे. याशिवाय या कारवाईत ५४१ किलो ५३० ग्रॅम कच्चा माल जप्त करण्यात आला. यात मिथिलीन डायक्लोराईड, अॅसिटोन, मोनोमिथाईल अमाईन, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि 2-ब्रोमो यांच्या समावेश आहे. याशिवाय एमडी निर्मितीसाठी लागणारी उपकरणेही डीआरआयने जप्त केली आहेत. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी कारखाना चारही बाजूंनी झाकून ठेवण्यात आला होता.

रसायनशास्त्राचे ज्ञान असलेल्या दोघांना अटक

या कारवाईत दोन रसायनशास्त्राचे चांगले ज्ञान असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यानंतर उत्तरप्रदेशातील बस्ती येथे एका महत्त्वाच्या आरोपीला अटक करण्यात आली. तो भिवंडी (मुंबई) येथून भोपाळला कच्चा माल पुरवण्याचे काम पाहत होता. याशिवाय, मुंबईतील दोन पुरवठादार व रसायन वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असे उघड झाले की सूरत व मुंबई येथून हवाला मार्गे पैसे भोपाळला पाठवले जात होते. याप्रकरणी सूरतमधूनही एकाला अटक करण्यात आली.

दाऊदचा विश्वासू थेट संपर्कात

एमडी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य भिवंडी येथून डोलाच्या सूचनेनुसार पाठवले जात होते. मार्च ते जुलै २०२५ या कालावधीत भोपाळ येथील कारखान्यास तब्बल ४०० किलो कच्चा माल पुरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये प्रशांत थोरात, वीरन शहा आणि अझरुद्दीन इद्रीसी यांचा समावेश आहे. तपासादरम्यान उघड झाले की, फेब्रुवारी २०२५ मध्ये तुर्की येथून सलिम डोला याने या टोळीतील आरोपींना संपर्क साधला आणि रसायने खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली. त्यानंतर वीरन शहा या रसायने पुरवायचा. त्यासाठी त्याला दोन हजार रुपये प्रतिकिलो कमिशन मिळत होते. त्याच आमीषामुळे तो या टोळीत सहभागी झाला. शहा दर महिन्याला एक विशिष्ठ रसायन पुरवत होता. मार्चमध्ये ५० किलो, एप्रिलमध्ये १०० किलो, मेमध्ये ५० किलो, जूनमध्ये १०० किलो व जुलैमध्ये १०० किलो रसायनाचा पुरवठा केल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. दाऊदचा विश्वासू डोलाच्या सूचनेनुसार हे रसायन बिनबिल पुरवले जात होते आणि खोटे दस्तऐवज तयार करण्यात येत होते.

भिवंडीतून रसायनांचा पुरवठा

डीआरआयच्या मुंबई विभागीय कक्षाने शनिवारी अझरुद्दीन इद्रिशीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांतील सहभागाबाबत कबुली दिली. भिवंडी येथून कच्चा माल वाहतूक करण्यासाठी त्याला आश्रफ रैन नावाच्या व्यक्तीकडून आर्थिक लाभ देण्यात आला होता. त्याला भिवंडीतील अंजूर फाटा परिसरातून रसायन घेऊन मिनी ट्रकमधून भोपाळ येथे पोहोचवण्याचे काम दिले गेले होते.