१८ विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांबाबत संशय; पदव्युत्तरचे राखीव प्रवर्गातील प्रवेशही अडचणीत

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील अनुसूचित जमातींकरिता (एसटी) राखीव असलेल्या वैद्यकीय व दंत या पदवीच्या जागांवर बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या आधारे डल्ला मारण्याचा प्रकार यंदा म्हणजे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांतही काही विद्यार्थ्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अशा १८ विद्यार्थ्यांकडून खुलासा मागविला आहे. यापैकी काही विद्यार्थी हे आपले बिंग फुटू नये म्हणून नामांकित महाविद्यालयात जागा निश्चित झाली असतानाही प्रवेश घेण्यासाठी फिरकलेले नाहीत. यामुळे, या जागा पुढील प्रवेश फेरीकरिता इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्याची शक्यता असली तरी वैद्यकीय शिक्षण संस्थांना झालेली जात चोरीच्या रोगाची वाढती लागण चिंताजनक आहे.

या प्रकरणाचा मुळापासून छडा लावण्याकरिता वैद्यकीयच्या पदवीबरोबरच पदव्युत्तर जागांवर २०१६मध्ये प्रवेश झालेल्या ३००हून अधिक विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रांचीही सत्यता तपासण्याचा निर्णय संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे, बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नव्याने प्रवेश झालेल्या पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश रद्द होण्याबरोबरच पोलिसी कारवाईची नामुष्की स्वीकारावी लागणार आहे.

गेल्या चार वर्षांत बोगस जात आणि जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या आधारे जे.जे., कूपर, शीव आदी नामांकित सरकारी महाविद्यालयांमधील राखीव जागा खुल्या वर्गातील विद्यार्थी कसे लुटत आहेत, यावर ‘लोकसत्ता’ गेले काही दिवस प्रकाश टाकत आहे. त्यातूनच १९ विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द झाले. मात्र गेली कित्येक वर्षे हा गैरप्रकार बिनदिक्कत सुरू राहिल्याने यंदाही काही विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे राखीव जागांत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ‘लोकसत्ता’मधील वृत्तांमुळे जाग आलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राखीव प्रवर्गातून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राची कसून तपासणी सुरू केली. यातूनच प्रथम खान, खत्री, शेख, अन्सारी अशा आदिवासी जमातींशी संबंधित नसलेल्या वेगवेगळ्या आडनावाच्या नऊ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या प्रमाणपत्रांची छाननी पडताळणी समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त आणखी नऊ विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांविषयी संशय आहे. या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीही प्रवेशासाठी अर्ज केला होता. मात्र, तेव्हा वेगळी आणि या वर्षी वेगळी जात दाखवित त्यांनी राखीव प्रवार्गातील जागांवर दावा केला होता. या विद्यार्थ्यांबाबत शंका आल्याने आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे, असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांनी सांगितले.

यादीच तयार.

पदवीबरोबरच २०१६मध्ये राखीव प्रवर्गातून प्रवेश झालेल्या पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचीही तपासणी जात पडताळणी समितीकडून करण्यात येत आहे. अशा पदवी आणि पदव्युत्तरच्या मिळून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची यादीच संचालनालयाने तयार केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे आम्ही त्या त्या समितीकडे पाठविली असून तीही बोगस असल्याचे आढळून आल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असे संचालनालयातील सूत्रांनी सांगितले.

 

जे.जे.च्या नऊ विद्यार्थ्यांवर गुन्हा ; बनावट जात प्रमाणपत्रप्रकरण

मुंबई ; बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ‘जे.जे. वैद्यकीय महाविद्यालया’तील नऊ विद्यार्थ्यांविरोधात जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री महाविद्यालयातर्फे तक्रार दिल्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करणे आणि फसवणूक या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या नऊपैकी दोन विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहेत. तर, एकाने नुकताच प्रवेश घेतला आहे. गुरुवार रात्रीपर्यंत या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली नव्हती.

महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याचे ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणले होते. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांविषयी साशंकता असेल त्यांची चाचपणी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकांनी दिले होते. जे.जे. महाविद्यालय प्रशासनाने अधिकाऱ्यांना या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची छाननी करण्यास सांगितले होते. यात नऊ विद्यार्थ्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाले. धुळ्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर नंदूरबारचा पत्ता देण्यात आल्याचे आढळले. तसेच, इतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली पडताळणी प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत पुढे आलेल्या माहितीच्या आधारे, महाविद्यालय प्रशासनाने बुधवारी सायंकाळी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात या विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली.