मुंबई : नीट यूजी २०२५ परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर होऊन महिना उलटला तरीही वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. वैद्यकीय समुपदेशन समितीने दिलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) गुरूवारी नीट यूजीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार अखिल भारतीय कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेला २१ जुलैपासून, तर राज्य कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेला ३० जुलैपासून सुरुवात होणार आहे. तसेच १ सप्टेंबरपासून महाविद्यालये सुरू होणार असल्याचे एनएमसीकडून जाहीर करण्यात आले आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या नीट यूजी परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर झाला. त्यानंतर काही दिवसांतच प्रवेश परीक्षेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली. निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल १ महिन्यानंतर अखिल भारतीय कोटा आणि राज्य कोट्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे एनएमसीने नीट-यूजी समुपदेशन फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अखिल भारतीय कोटा, डिम्ड विद्यापीठ आणि केंद्रीय विद्यापीठासाठी समुपदेशानाची पहिली फेरी २१ ते ३० जुलैदरम्यान सुरू होणार असून, या फेरीमधील विद्यार्थ्यांना ६ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय कोट्याची दुसरी समुपदेशन फेरी १२ ते २० ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना २९ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. तिसरी समुपदेशन फेरी ३ ते १० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून, १८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे.

एनएमसीच्या सूचना

वेळापत्रकादरम्यान शनिवार, रविवार आणि अन्य सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची, तसेच एमसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना एनएमसीने सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमधील समुपदेशन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्य कोट्यांतर्गत फेरी ३० जुलैपासून सुरू होणार

राज्य कोट्यांतर्गत समुपदेशन फेरीला ३० जुलै ते ६ ऑगस्टदरम्यान सुरुवात होणार असून, या समुदेशन फेरीमधील विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसरी फेरी १९ ते २९ ऑगस्टदरम्यान आणि तिसरी फेरी ९ ते १८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

मुक्त समुपदेशन (स्ट्रे) फेरी २२ ते २९ सप्टेंबरदरम्यान

अखिल भारतीय काेट्यासाठी मुक्त समुपदेशन फेरी २२ ते २६ सप्टेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. तर राज्य कोट्यासाठी २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत समुपदेशन फेरी राबविण्यात येणार आहे. या दोन्ही कोट्यांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.