मुंबई : वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) पूर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्ष किरण शास्त्र (रेडिओलॉजी), शस्त्रक्रिया (सर्जरी) आणि औषध विभाग (मेडिसिन) या शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या पहिल्या यादीत याच विभागांना विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर लगेच स्वत:चा व्यवसाय सुरू करणे शक्य असल्यामुळेच विद्यार्थी या शाखांना अधिकाधिक पसंती देत आहेत.
शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग, सामान्य औषध या शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेऊन सुपरस्पेशालिटी क्षमता मिळवता येते. यामुळे विद्यार्थ्यांना चांगले उत्पन्न मिळवता येते. अनेक शाखांमधील डॉक्टरांना कायम रुग्णालयामध्ये किंवा क्लिनिकमध्ये राहावे लागते. मात्र सुपरस्पेशालिटी केलेल्या डॉक्टरांना कमी व्यापामध्ये अधिक उत्पन्न मिळत असल्याने त्यांना दैनंदिन आयुष्याचाही आनंद घेता येत असतो. त्यामुळे बहुतेक डॉक्टर पदव्युत्तर शिक्षणासाठी रेडिओलॉजी, शस्त्रक्रिया, औषध शास्त्र, अस्थिव्यंग, त्वचा शास्त्र या विभागाला प्राधान्य देत असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली. स्त्रीरोग शास्त्रामध्ये शिक्षण घेण्याला मुलींची अधिक पसंती असते. या शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे प्रमाण हे एक ते दोन टक्के इतकेच असल्याचे त्यांनी सांगितले.
औषध शास्त्रातील सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमामध्ये जास्त जागा आहेत आणि डॉक्टरांना त्यांच्या शिक्षणानंतर लगेचच खासगी दवाखाना सुरू करता येतो. सध्या डॉक्टर रेडिओलॉजी व औषध शास्त्र सुपरस्पेशालिटीसाठी निवडत असले तरी शस्त्रक्रिया व अन्य अभ्यासक्रमांना त्यापाठोपाठ प्राधान्य दिले जात असल्याचे फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अविरल माथूर यांनी सांगितले. पदव्युत्तर शिक्षणाला प्रवेश घेताना दरवर्षी विद्यार्थ्यांचा कल बदलत असतो. मात्र त्यातही रेडिओलॉजी, स्त्रीरोग शास्त्र, शस्त्रक्रिया व अस्थिव्यंग शास्त्र या शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम असतो. या शाखांना प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच स्वत:चे क्लिनिक सुरू करता येते व उत्पन्न मिळवता येते. त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यास मदत होत असल्याचे राज्य सामाईक प्रवेश कक्षाचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. सिद्धेश नार यांनी सांगितले.
रेडिओलॉजीही पसंती
तंत्रज्ञान अधिक विकसित झाल्यामुळे रेडिओलॉजीमध्ये अनेक नवीन उपशाखा तयार झाल्या आहेत. आजाराचे अधिक जलद निदान करण्यासाठी या शाखेचा उपयोग होत असल्यामुळे यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी अधिक वाव असल्यामुळे या विभागालाही चांगली पसंती मिळत असल्याचे डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.