मुंबई : मलबार हिल परिसरातील सह्याद्री अतिथीगृहासमोर मंगळवारी एका बेस्ट बसने दिलेल्या धडकेत एक ज्येष्ठ नागरिक महिला ठार झाल्याच्या दुर्घटनेनंतर आता या परिसरातील वाहतूक कोंडीचा विषय ऐरणीवर आला आहे. या परिसरातील सह्याद्री अतिथीगृह आणि मंत्र्यांचे बंगल्यांमध्ये होणाऱ्या बैठकांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. आधीच अरुंद रस्ते असलेल्या या परिसरात पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

दक्षिण मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू परिसरातील रहिवाशांना गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात आधीच रस्ते अरुंद आहेत. गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील मंत्र्यांचे बंगले आणि सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकांचे सत्र वाढले आहे. त्यामुळे या परिसरात रोज मंत्र्यांच्या गाड्या, कार्यकर्त्यांच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या, प्रसारमाध्यमांच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे या परिसरातील रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. मंत्र्याच्या बंगल्याबाहेर आणि अतिथीगृहाबाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची कायम गराडा असतो. त्याचाही इथल्या रहिवाशांना त्रास सोसावा लागतो. त्यामुळे राजकीय बैठका मंत्रालयातच व्हाव्या, अशीही मागणी येथील रहिवाशांनी वारंवार केली आहे.

याबाबत मलबार हिल रहिवासी संघटनेच्या परवीन संघवी यांनी सांगितले की, मंगळवारचा अपघात वाहतूक कोंडीमुळे झाला की बेस्टच्या चालकाच्या चुकीमुळे ते मला माहीत नाही. परंतु, गेल्या काही वर्षांत मलबार हिल परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे या परिसरातील आमच्या सारख्या रहिवाशांना आता रस्त्यावर चालण्याचीही भीती वाटू लागली आहे. माऊंट प्लेसण्ट रोड म्हणजेच भाऊसाहेब हिरे मार्ग हा अतिशय अरुंद असून या ठिकाणी आता आम्हाला गाड्याही उभ्या करू दिल्या जात नाहीत. हा अतिमहत्त्वाचा रस्ता असल्याचे सांगून रहिवाशांना गाड्या उभ्या करू दिल्या जात नाहीत. मात्र सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरच्या रस्त्यावर पदपथावर पोलिसांच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. याबाबत वाहतूक पोलिसांकडे अनेकदा तक्रार करूनही त्यावर काहीच उपाययोजना होत नाही, अशी खंतही संघवी यांनी व्यक्त केली.

बेस्टच्या अवजड बसगाड्या मलबार हिल परिसरातून अरुंद रस्त्यावरून तीन बत्ती परिसरातील चौकातून वळून परत चर्नीरोडच्या दिशेने जातात. तर काही बसगाड्या तीन बत्ती इथे वळण घेऊन वर सह्याद्री अतिथीगृहाकडे किंवा कमला नेहरू उद्यानाकडे जातात. मात्र हे रस्ते आधीच अरुंद असल्यामुळे बसचे वळण घेणेही अनेकदा जीवघेणे वाटत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यातच बेस्टने भाडेतत्वावर ज्या गाड्या घेतल्या आहेत त्यांचे चालक प्रशिक्षित नसून मुंबईतील अशा गजबजलेल्या भागात गाड्या चालवणे त्यांच्या आवाक्यापलिकडचे असल्याचेही परवीन संघवी यांनी सांगितले.