मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागात रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक असेल. मात्र, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लाॅक नाही.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ दरम्यान
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा या लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. नियोजित वेळेपेक्षा या लोकल १५ मिनिटे विलंबाने धावतील.
हार्बर मार्ग
कुठे : मानखुर्द – नेरुळदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ दरम्यान
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटीवरून वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तथापि, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – मानखुर्द आणि पनवेल – नेरुळ / ठाणेदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४.३० दरम्यान ट्रान्सहार्बर मार्ग / मुख्य मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली – भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११.१५ ते पहाटे ४.१५ दरम्यान
परिणाम : ब्लाॅक कालावधीत विरार / वसई रोड – बोरिवलीदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लाॅक काळात काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.