मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने मेफेड्रॉनची (एमडी) निर्मिती करणाऱ्या टोळीवर कारवाई करून ७०० किलो मेफेड्रॉन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थाची किमंत १,४०३ कोटी रुपये असून याप्रकरणी आतापर्यंंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अंमलीपदार्थविरोधी विशेष मोहिमेंतर्गत वरळी अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने गस्तीदरम्यान शिवाजीनगर येथे एका संशयीताला २५० ग्रॅम ‘एमडी’सह (मेफेड्रॉन) ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याच्याकडून एमडी पुरवणाऱ्याची माहिती पोलिसांना मिळाली.

याप्रकरणी अंमलीपदार्थ पुरवठादाराकडून पोलिसांनी २ किलो ७६० ग्रॅम एमडी जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी २७ जून रोजी एका महिलेला अटक करण्यात आली. या महिलेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २ आणि ३ ऑगस्ट रोजी चौथ्या व पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली. पाचव्या आरोपीने रसायन शास्त्रामध्ये शिक्षण घेतले असून वेगवेगळी रसायने एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून ‘एमडी’ची (मेफेड्रॉन) निर्मिती करण्यात आल्याची कबुली त्याने दिली. समाज माध्यमावरून आरोपी त्याची विक्री करीत होता. त्याच्याकडून एकूण ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचे १४०३ कोटी ४८ लाख रुपये किंमतीचे ‘एमडी’सदृश्य अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले.