गुरुवारी दुपारी २.३० ची वेळ.. ठिकाण खार पश्चिमेची मंडई.. अचानक पोलीस, अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका, पालिका अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा दाखल झाला आणि एकच गोंधळ उडाला.. मोडकळीस आलेल्या मंडईतून गाळेधारकांना बाहेर काढण्याची कारवाई सुरू झाली असावी असा संशय आल्यामुळे व्यापारी वर्ग अस्वस्थ झाला. पण तासाभरात आपत्कालीन व्यवस्थापनाचे मॉक ड्रील आटोपून या ताफ्यातील अधिकारी-कर्मचारी आपापल्या कार्यालयात रवाना झाले. मात्र धोकादायक बनलेल्या मंडईतील गाळे आणि सदनिका रिकाम्या करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत असल्यामुळे व्यापारी मात्र अस्वस्थ होते.
खार पश्चिमेच्या कबुतरखान्याजवळील आचार्य आत्माराम भाऊ लाड मंडई आणि त्याचाच एक भाग असलेली पालिका वसाहतीची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे पालिकेने व्यापारी आणि वास्तव्य करीत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना ३१ मेपर्यंत जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली
आहे.
मुंबईतील मोडकळीस आलेल्या २५ मंडयांच्या पुनर्विकासासाठी पालिकेने ‘परिशिष्ट-२’ दिले होते. त्यात या मंडईचाही समावेश होता. मात्र मंडयांची दुरुस्ती आणि पुनर्विकासाचे धोरण ठरविण्याचे आदेश सरकारने दिल्यामुळे या मंडयांचा पुनर्विकास रेंगाळला. आता या मंडईची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. दुर्घटना घडू नये यासाठी जागा रिकामी करण्याची नोटीस पालिकेने व्यापारी आणि रहिवाशांवर बजावली आहे. रहिवाशांना पर्यायी जागाही देण्यात आली आहे. मात्र व्यापाऱ्यांनी येथून जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
नोटीसची मुदत शुक्रवारी संपत असतानाच अचानक गुरुवारी मंडई परिसरात आलेला पोलीस, अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका, पालिका अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा पाहून व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. कोणत्याही परिस्थितीत जागा सोडणार नाही, असा निर्धार करीत व्यापाऱ्यांनी या ताफ्याला गराडा घातला. मात्र आपत्कालीन व्यवस्थापनविषयक मॉक ड्रील पूर्ण करून हा ताफा तासाभरात तेथून निघून गेला.