मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा सुरू होऊन एक महिना होत नाही तोच या मार्गिकेवरील मेट्रो गाडी भुयारातच बंद पडण्याची घटना घडली आहे. बीकेसीच्या दिशेने जाणारी मेट्रो रात्री पावणेआठच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे दोन मेट्रो स्थानकांच्या मध्ये भुयारात बंद पडली. अचानक मेट्रो भुयारातच बंद पडल्याने प्रवासी गाडीत अडकले आणि एकच गोंधळ सुरू झाला. शेवटी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गाडी ज्या ठिकाणी बंद झाली होती त्या ठिकाणी धाव घेत गाडीतील तांत्रिक बिघाड दूर केला आणि गाडी नजीकच्या टी १ मेट्रो स्थानकावर आणली. त्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यादरम्यान आरे ते बीकेसी मेट्रो सेवा २० मिनिटे विस्कळीत झाली होती.

शनिवारी आरे मेट्रो स्थानकातून सुटलेली आणि बीकेसीला जाणारी मेट्रो गाडी सहार आणि टी १ मेट्रो स्थानकाच्या मध्ये भुयारात बंद पडली. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडली. गाडीत लहान मुले आणि वयोवृद्ध असल्याने अनेक प्रवासी काहीसे घाबरले होते. काहींनी गाडीतील मेट्रो पायलटशी संपर्क साधत लवकरात लवकर सुटका करण्याची विनवणी केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमएमआरसीचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर तत्काळ तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले.

हेही वाचा – Sada Sarvankar : सदा सरवणकर यांचं वक्तव्य, “राज ठाकरेंच्या मनात काय ते मला..”

हेही वाचा – मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० मिनिटांनंतर तांत्रिक बिघाड दूर झाला आणि गाडी सुरू झाल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. गाडी सुरू झाल्यानंतर ही गाडी टी-१ टर्मिनल स्थानकावर नेण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत गाडी कारशेडमध्ये पाठवण्यात आली. मात्र, यादरम्यान २० मिनिटे आरे ते बीकेसी दरम्यानची भुयारी मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती.