मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मालकीच्या जागेवरील अनधिकृत जाहिरात फलकाविरोधातील कारवाई सुरूच आहे. मंडळाने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने गुरुवारी दुसरा अनधिकृत जाहिरात फलक हटविला.

घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेची गंभीर दखल घेत म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी म्हाडाच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व विभागीय मंडळांना दिले होते. त्यानुसार मुंबईत ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळले आहेत. म्हाडाच्या जागेवर जाहिरात लावण्यासाठी मुंबई मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न घेता ६० जाहिरात फलक लावण्यात आल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. त्यानंतर म्हाडाने पालिकेला पत्र पाठवून अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची सूचना केली होती. मात्र पालिकेकडून यासंबंधीची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबई मंडळाने आता स्वतः अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. जाहिरात फलक हटविण्यासाठीची यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ म्हाडाकडे नाही. त्यामुळे मुंबई मंडळाने पालिकेच्या मदतीने जाहिरात फलक हटविण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – दक्षिण मुंबईत वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक

हेही वाचा – मुंबई : लाकूड जाळून चालणाऱ्या बेकऱ्या बंद होणार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात मुंबई मंडळाने मौजे विलेपार्ले (ता. अंधेरी) येथील भूखंड क्रमांक ३६, विलेपार्ले शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्था येथील अनधिकृत जाहिरात फलकाविरोधात कारवाई केली होती. हा ४० बाय ४० फुटाचा भलामोठा जाहिरात फलक होता. हा अनधिकृत फलक हटविल्यानंतर मुंबई मंडळाने गुरुवारी (२० जून) वर्सोवा येथील एमटीएनएल एस.व्ही.पी. नगर येथील अनधिकृत जाहिरात फलक हटविल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्याने दिली. मुंबई मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न घेता हा जाहिरात फलक लावण्यात आला होता. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. पोलीस संरक्षण, पालिकेचे मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध होताच एक एक जाहिरात फलक हटविण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.