२० टक्क्यांमधील १२३६ घरांचा समावेश

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून पुढील आठवड्यात ३००० हून अधिक घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सोडतीत पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूरमधील घरांचा समावेश आहे. तर २० टक्क्यांमधील १२३६ घरे सोडतीत समाविष्ट असून उर्वरित घरे म्हाडा गृहप्रकल्पातील आहेत. दिवाळीदरम्यान या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू असणार असल्याने इच्छुकांसाठी म्हाडाकडून ही दिवाळी भेट मानली जात आहे.

कोकण मंडळाची ८९८४ घरांची सोडत मागील आठवड्यात पार पडली. ही सोडत झाल्याबरोबर आता पुण्यातील ३००० हून अधिक घरांची सोडत जाहीर होत आहे. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व गटांसाठीच्या घरांचा या सोडतीत समावेश आहे. आठवड्याभरात यासाठी जाहिरात प्रसिद्ध करत २८ वा २९ ऑक्टोबरपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली. कोकण मंडळाप्रमाणे पुण्याच्या सोडतीतही २० टक्क्यांतील घरांचा समावेश आहे. अशी १२३६ घरे सोडतीत आहेत. तर म्हाळुंगे येथील १००० घरांसह कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुण्यातील काही घरेही सोडतीत समाविष्ट असल्याचे माने यांनी सांगितले.

एका वर्षात तिसरी सोडत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई मंडळाच्या घरांना सर्वाधिक मागणी असताना मुंबईत सोडतीसाठी पुरेशी घरे उपलब्ध होत नसल्याने अडीच वर्षे झाली तरी सोडत निघालेली नाही. तर मुंबईसाठी कधी सोडत निघेल हा प्रश्न अनुत्तरित आहे. असे असताना पुणे मंडळाने मात्र एका वर्षात दोन सोडती काढल्या असून आता तिसरी सोडतही काढली जात आहे. जानेवारी आणि मे मध्ये सोडत झाल्यानंतर  नोव्हेंबरमध्ये तिसरी सोडत फुटणार आहे.