मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) म्हाडाशी संबंधित तब्बल १५ कोटी दस्तऐवज आता घरबसल्या पाहता येणार आहेत. म्हाडाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर १५ कोटी दस्तऐवज उपलब्ध केले असून आता माहिती मिळविण्यासाठी म्हाडा कार्यालयात जाण्याची अथवा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करण्याचीही आवश्यकता कमी होणार आहे. सोडतीतील विजेत्यांची माहिती, संवेदनशील दस्तऐवज वगळता इतर सर्व माहिती म्हाडाने संगणकीय पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे.
म्हाडाच्या सर्व प्रादेशिक मंडळांचे कार्यालयीन दस्तऐवज बघण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत माहिती स्वयंप्रकटीकरणाद्वारे म्हाडाने १५ कोटी दस्तऐवज संगणकीय पद्धतीने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील काही महिने हे काम सुरु होते. हे काम पूर्ण झाले असून शुक्रवारपासून १५ कोटी दस्तऐवज सर्वसामान्यांना पाहता येत आहेत.
म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर म्हाडातील संबंधित सर्व विभागांचा वर्गवारीनुसार १५ कोटी दस्तऐवज (संवेदनशील वगळून) नागरिकांना केवळ पाहण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.
तर म्हाडाच्या या निर्णयामुळे कार्यालयीन प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, असा विश्वासही जयस्वाल यांनी व्यक्त केला. म्हाडाच्या विविध विभागांतील सूचना, निविदा, कार्यालयीन आदेश, कार्यालयीन टिप्पणी, प्रस्ताव मंजुरी यासारख्या दस्तऐवजाचा समावेश असून नागरिकांना सदर दस्तऐवज म्हाडा संकेतस्थळावर सहज घर बसल्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करण्याची आवश्यकता कमी होणार असल्याचेही यानिमित्ताने म्हटले जात आहे. दरम्यान, सोडतीदरम्यान अर्जदार, विजेत्यांकडून घेतली जाणारी कागदपत्रे, माहिती गुप्त ठेवण्यात असून ही कागदपत्रे वगळून त्यातून वगळण्यात आली आहेत.
म्हाडाच्या संकेतस्थळावरील माहिती पाहता येणार आहे. त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे सर्व दस्तऐवज सुरक्षित असणार आहेत. तर ही माहिती पाहण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावरील संबंधित विभागातील विभागनिहाय अभिलेखमध्ये जाऊन अर्जदाराने स्वतःची नाव नोंदणी आणि लाॅगिन करणे आवश्यक असेल. लाॅगिन करताना भ्रमणध्वनी क्रमांक, नाव, लिंग, जन्म तारीख, यूजर नेम, पासर्वड, अटी, शर्ती मंजूर करून लाॅगिन पासवर्ड नोंदवणे आवश्यक असेल. अर्जदाराने आधार किंवा पॅन कार्ड क्रमांक नमुद केल्यानंतर केवायसी ओटीपी पडताळणी पूर्ण होणार आहे.
यानंतरच संकेतस्थळावरील म्हाडाच्या विविध विभागांशी संबंधित दस्तऐवज नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध होणार आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही दस्तऐवज डाऊनलोड करता येणार नाही अथवा त्यांचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत. दस्तऐवज पाहताना नागरिकांना कारण नमूद करणे बंधनकारक असणार आहे. तसेच नागरिकांच्या संकेतस्थळावरील माहितीच्या सुरक्षिततेसाठी सायबर सिक्युर लेअर आणि सेक्युरिटी ऑडिटचा अवलंब करण्यात आला आहे.
जेणेकरून कोणीही कोणत्याही व्यक्तीची खासगी माहिती मिळवू शकणार नाही. म्हाडाचे संकेतस्थळ माहिती शोधण्यास अधिक सोपे, सुटसुटीत व अद्ययावत करण्यात आले असून लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सेवा अधिसूचित करून संगणकीय पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.