‘म्हाडा’च्या पवईतील घरांचा दर चौरस फुटाला तब्बल १५ हजार रुपयांच्या घरात गेल्यावरून टीकेची झोड उठल्यानंतर आता ‘म्हाडा’ने सारवासारव करण्यासाठी बांधकाम क्षेत्राचा विचार करता हा दर चौरस फुटाला १५ हजार नव्हे तर नऊ ते दहा हजार रुपये इतकाच पडतो, असा शहाजोग युक्तिवाद केला आहे.
‘म्हाडा’च्या यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या घराचा दर सुमारे साडेचार हजार रुपये प्रति चौरस फूट असून पवईतील उच्च उत्पन्न गटातील घराचा दर तर तब्बल चौरस फुटाला १५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. यावरून मोठी टीका झाली. खासगी बिल्डरांच्या दराने ‘म्हाडा’ घरांची विक्री करत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. दरावरून टीकेची झोड उठल्यानंतर ‘म्हाडा’ने सारवासारव करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पवईतील तुंगवा येथील मध्यम उत्पन्न गटातील घराचा आकार चटई क्षेत्राप्रमाणे ३०५ चौरस फूट असला तरी त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र ५६० चौरस फूट ठरते. त्यामुळे या घराची ४८ लाख ८६ हजार ४४३ ही किंमत लक्षात घेता या घराचा दर चौरस फुटाला ८७२० रुपये इतका असल्याचा दावा ‘म्हाडा’ने केला आहे. तर उच्च उत्पन्न गटातील घराचा आकार ४७६ चौरस फूट दिसत असला तरी त्याचे बांधकाम क्षेत्रफळ ७६६ चौरस फूट ठरते. त्यामुळे घराची ७५ लाख २२ हजार ६२५ रुपये ही किंमत लक्षात घेत घराचा दर प्रति चौरस फुटाला ९८१० रुपये इतकाच निघतो, असे ‘म्हाडा’ने दराबाबतच्या खुलाशात म्हटले आहे. मात्र, ‘म्हाडा’ जर चटई क्षेत्रफळानुसार घरांची विक्री करत असेल तर दराचा विचार बांधकाम क्षेत्रानुसार कसा करायचा असा प्रश्न निर्माण होत आहे.
घरांच्या संख्येबाबतही ‘म्हाडा’चा गोंधळ सुरू आहे. ‘म्हाडा’ने यंदा १२५९ घरांसाठी जाहिरात काढली. त्यात बांधून तयार असलेल्या २५१ घरांचा समावेश आहे. ५७ घरांचे बांधकाम झाले असून भोगवटा प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. तर बांधकाम सुरू असलेल्या ९५१ घरांचा समावेश होता. पण आता जाहिरातीनंतर पुन्हा एकदा सोडतीमधील घरांच्या संख्येत बदल झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या संख्येत १५ घरांची कपात झाली असून आता ती संख्या ९३६ वर आली आहे. त्यामुळे यंदाची सोडत १२४४ घरांची असणार आहे. पवईतील मध्यम उत्पन्न गटातील तीन तर उच्च उत्पन्न गटातील १२ घरे कमी करण्यात आली आहेत. अग्निशमन सुरक्षेसाठी सोडायची जागा लक्षात न आल्याने घरांची संख्या वाढवून दाखवली गेली. आता ती चूक दुरुस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.