अंबरनाथमधील २५३१ घरांसह २२ दुकानांच्या प्रकल्पासाठी मागणी निर्धारण सर्वेक्षण

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार-बोळींजमध्ये सर्वात मोठा गृहप्रकल्प बांधला असून या प्रकल्पातील हजारो घरे विक्रीविना धूळ खात पडून आहेत. तर कोकण मंडळाच्या इतर ठिकाणच्या घरांकडेही अर्जदारांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे मंडळ आर्थिक विवंचनेत असून यापुढे घरे विक्रीविना धूळ खात पडून राहू नये यासाठी मंडळाने आता घरांची मागणी तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंबरनाथमधील दोन प्रकल्पांतील २५३१ घरांसह २२ दुकानांच्या बांधणीसाठी मागणी निर्धारण सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान हे सर्वेक्षण होणार असून या सर्वेक्षणात इच्छुकांकडून घराला मागणी आली तरच त्यांच्या बांधणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कोकण मंडळांच्या घरांना १०-१५ वर्षांपूर्वी चांगला प्रतिसाद होता. मंडळाच्या सोडतीतील घरांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज येत होते. ही मागणी पाहता मंडळाने विरार-बोळींजमध्ये १० हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला, तर ठाण्यातील विविध ठिकाणी घरे बांधण्यास सुरुवात केली. यात पंतप्रधान आवास योजनांचाही समावेश आहे. मंडळाने मागील काही वर्षात मोठ्या संख्येने घरे बांधली, मात्र या घरांना सोडतीत प्रतिसादच मिळाला नाही. विरार-बोळींजमधील घरे मोठ्या संख्येने विक्रीवाचून रिक्त राहिली. शिरढोणसह इतर प्रकल्पांतील घरांनाही प्रतिसाद मिळेना. परिणामी, एकूण ११ हजारांहून अधिक घरांना विक्रीची प्रतीक्षा असल्याने आणि यामुळे मंडळाचा कोट्यवधींचा महसूल अडकल्याने या घरांची प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य तत्वाने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष जाहिरात मोहीम राबविण्यात आली. इतकेच नव्हे तर रिक्त घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने स्वतंत्र धोरण तयार केले. या धोरणाअंतर्गत विविध पर्यांय उपलब्ध करीत घरांची विक्री सुरू केली. मात्र अद्यापही रिक्त घरांच्या विक्रीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रथम प्राधान्य तत्वावरही संथगतीने घरांची विक्री सुरू आहे. नुकत्याच काढण्यात आलेल्या २२६४ घरांच्या सोडतीतही अंदाजे १०२५ घरे प्रतिसादाअभावी रिक्त राहिली आहेत. यातील मोठ्या संख्येने घरे ही म्हाडा गृहनिर्माण योजनेतील आहेत. शिरढोणमधील घरे या सोडतीत मोठ्या संख्येने रिक्त राहिली आहेत. एकूणच घरांची मागणी लक्षात न घेता मंडळाकडून प्रकल्प राबवविले जात आहेत. त्यामुळे  घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आता मंडळाने मागणी तपासूनच घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार अंबरनाथमधील शिवगंगानगर येथील म्हाडाच्या जागेवर अत्यल्प गटासाठी ३० चौ. मीटरची १५१ घरे आणि मध्यम गटासाठी ६४ चौ. मीटरची ७४४ घरे बांधण्यासाठी कोकण मंडळाने मागणी निर्धारण सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवगंगानगरसह अंबरनाथमधील कोहोज, खुंटवली येथील ३० चौ. मीटरच्या १६०६ घरांसह २२ दुकानांच्या बांधणीसाठीही मागणी निर्धारण सर्वेक्षण केले जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांतील एकूण २५३१ घरांसह २२ दुकानांच्या बांधकामासाठी मागणी निर्धारण सर्वेक्षणासाठीचे निवेदन बुधवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनानुसार ११ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान सर्वेक्षण होणार आहे. https://demandassessmentcitizen.mhada.gov.in या लिंकवर जाऊन इच्छुकांना सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे. हे सर्वेक्षण झाल्यानंतर आणि मागणी असल्यानंतरच घरांची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० ते २२ लाख आणि ५० लाखांत घरे अंबरनाथमधील कोहोज खुटंवलीतील अत्यल्प गटातील १६०६ घरांसाठी २० ते २२ लाख रुपये अशी किंमत असणार आहे. तर शिवगंगानगरमधील अत्यल्प गटातील १५१ घरांसाठी २० ते २२ लाख रुपये तर मध्यम गटातील ७४४ घरांसाठी ५० लाख रुपये अशी किंमत असणार आहे. ही किंमती अंदाजित असल्याने यात कमीअधिक होण्याची शक्यता आहे. पण किंमती जाहीर करून सर्वेक्षण केले जात असल्याने ही बाब इच्छुकांसाठी महत्त्वाची असणार आहे.