मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५२८७ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीसाठी मागील काही दिवसांपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. या सोडतपूर्व प्रक्रियेस मंडळाने याआधी १४ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असताना त्याच दिवशी मंडळाने पुन्हा एकदा, दुसऱ्यांदा सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ दिली.

ही मुदतवाढ १५ दिवसांची असून आता या मुदतवाढीनुसार इच्छुकांना १५ सप्टेंबरपर्यंत अनामत रक्कम अदा करून अर्ज दाखल करता येणार आहेत. सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याने आता १९ सप्टेंबरची सोडत थेट ९ ऑक्टोबरवर गेली आहे. मूळ वेळापत्रकानुसार ३ सप्टेंबरला सोडत काढण्यात येणार होती.

कोकण मंडळाने २० टक्के योजनेतील ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक योजनेतील ३००२ घरे, म्हाडा योजनेतील १६७७ घरे, इतर ४१ घरे अशा एकूण ५२८५ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीसाठी १४ जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली आहे. मूळ वेळापत्रकानुसार १४ ऑगस्टपर्यंत संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम अदा करून इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार होते. तर ३ सप्टेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार होता. सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला, पण सोडतीतील खासगी विकासकांच्या २० टक्के योजनेतील ५६५ घरांसाठी सर्वाधिक अर्ज सादर होत असून १५ टक्के योजना आणि म्हाडा योजनेतील घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कोकण मंडळाने १४ ऑगस्टची मुदत संपण्याआधीच सोडतपूर्व प्रक्रियाला १४ दिवसांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ दिल्याने ३ सप्टेंबरची सोडत १८ सप्टेंबरवर गेली आहे. मुदतवाढीनुसार गुरुवारी, २८ ऑगस्टला अर्जस्वीकृतीची अंतिम मुदत होती. पण गुरुवारी पुन्हा दुसऱ्यांदा मंडळाने सोडतपूर्व प्रक्रियेस १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

नवीन मुदतवाढीनुसार १२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५० पर्यंत अर्जविक्री सुरू राहणार आहे. तर १३ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम अदा करून अर्ज दाखल करता येणार असून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत आरटीजीएस /एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर अर्जस्वीकृती प्रक्रिया बंद होईल आणि २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यावर सूचना-हरकती नोंदवून घेत ७ ऑक्टोबर रोजी अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. तर ९ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

सोडतपूर्व प्रक्रियाला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचे कारण विचारले असता अधिकाधिक इच्छुकांना सोडतीत सहभागी होता यावे यासाठी मुदतवाढ दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र २० टक्के योजनेचा अपवाद वगळता इतर योजनेतील घरांना कमी प्रतिसाद असल्याने या योजनेतील घरांसाठी समाधानकारक अर्ज दाखल व्हावेत यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा म्हाडात आहे. दरम्यान, सोडतीसाठी गुरुवारी दुपारी ४ पर्यंत १ लाख ४९ हजार ९४८ जणांनी अर्ज भरले असून यापैकी १ लाख १६ हजार ५८३ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. म्हणजेच ५२८५ घरांसाठी आणि ७७ भूखंडांसाठी आतापर्यंत १ लाख १६ हजार ५८३ अर्ज म्हाडाकडे सादर झाले आहेत. यातील सर्वाधिक अर्ज २० टक्के योजनेतील घरांसाठी असल्याचे समजते आहे.