मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८३ घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला सहा दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून अद्याप अर्ज विक्री-स्वीकृतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत इच्छुकांनी ११ हजार २१० अर्ज भरले असून अनामत रक्कमेसह भरलेल्या ५ हजार ८९ अर्जांचा त्यात समावेश आहे. प्रतिसाद कमी असला तरी सोडतीच्या ई नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६५ हजार १८८ जणांनी ई नोंदणी केली आहे. तसेच आतापर्यंत दोन लाख १५ हजार ७४८ इच्छुकांनी युझर आयडी तयार केला आहे. त्यामुळे भविष्यात अनामत रक्कमेसह सादर होणाऱ्या अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडा सोडतीत झालेल्या बदलानुसार आता एकच कायमस्वरूपी ई नोंदणी असणार आहे. याच एका नोंदणीवर कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. जोपर्यंत ई नोंदणीधारक सोडतीत यशस्वी होत नाही, तोपर्यंत त्यांना या ई नोंदणीवर पुढील अनेक वर्षे अर्ज भरता येणार आहे. या नव्या बदलासह मुंबईतील घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया सुरू आहे. अर्जदारांची पात्रता सोडतीआधीच निश्चित केली जात असल्याने आणि यासाठी अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. हीच बाब अनेकांसाठी काहीशी अडचणीची ठरत आहे. वेळेत कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने, कागदपत्रे तयार करण्यास वेळ लागत असल्याने मोठ्या संख्येने इच्छुक अर्ज करणे टाळत आहेत. तर काही जणांना अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळेच अर्ज विक्री-स्वीकृतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. सोमवारी पहिल्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत १ हजार ४७४ अर्जांची विक्री झाली होती, तर अनामत रक्कमेसह ५३४ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंत अर्जांची संख्या ५ हजार ३४४ गेली, तर यातील २ हजार २४५ अर्ज अनामत रक्कमेसह सादर झाले होते. आता शनिवारी दुपारपर्यंत अर्जांची संख्या ११ हजार २१० वर गेली आहे. तर अनामत रक्कमेसह ५ हजार ७९ अर्ज दाखल झाले आहेत.

हेही वाचा – ‘उद्धव ठाकरेंचे रक्ताचे भाऊ’, असा उल्लेख करत नितेश राणेंचा हल्लाबोल, म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी…”

अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सध्या संथगतीने सुरू असली तरी मोठ्या संख्येने ई नोंदणी करण्यात येत आहे. बुधवारपर्यंत २ लाख ३ हजार ८६५ इच्छुकांनी युझर्स आयडी तयार केले आहेत. शनिवारी युझर्स आयडीची संख्या थेट २ लाख १५ हजार ७४८ वर पोहोचली आहे. बुधवारी ६२ हजार ९१६ ई नोंदणी झाली होती. ती शनिवारी ६५ हजार १८८ वर पोहोचली. ही बाब लक्षात घेता भविष्यात मुंबईतील घरांसाठीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुळात चार वर्षांनी सोडत जाहीर झाल्याने आणि बऱ्याच काळाने अत्यल्प, अल्प गटासाठी मोठ्या संख्येने घरे उपलब्ध करण्यात आल्याने इच्छुकांकडून मोठ्या संख्येने अर्ज सादर होतील, असा विश्वास मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अर्जांची संख्या वाढावी यासाठी आता मंडळाने ई नोंदणीधारकांच्या आणि अर्जदारांच्या अर्ज सादर करण्यासंबंधीच्या काही अडचणी असल्यास त्याचे निरसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्जदारांना काय अडचणी येत आहेत, त्या कशा सोडवाव्या हे दूरध्वनीमार्फत संपर्क साधून सांगण्यात येणार असल्याचे मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada mumbai lottery 2023 huge increase in e registration but not as good response to application sale acceptance mumbai print news ssb
First published on: 27-05-2023 at 15:04 IST