मुंबई : म्हाडा घरांसाठी आता यापुढे सोडत जाहीर होईल तेव्हा इच्छुकांचा म्हाडा कार्यालयाशी अजिबात संपर्क येणार नाही. घराचा ताबा मिळेपर्यंत होणारा पत्रव्यवहार हा फक्त ईमेलद्वारे होणार आहे. त्यामुळे दलालांचा आता या सोडतीशी काडीचाही संबंध उरणार नाही. त्यामुळे म्हाडा घरांच्या सोडतीत होणारा भ्रष्टाचार संपुष्टात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ऋुतुजा लटकेंनी ही निवडणूक लढवू नये यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले – अनिल परब

मुंबई गृहनिर्माण मंडळाचे नवे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी त्यास दुजोरा दिला आहे. ही संकल्पना माजी मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांच्या प्रयत्नांतून तयार झाली आहे. त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जाईल. म्हाडा घरांची यापुढील सोडत या नव्या पद्धतीनुसार असेल, असे बोरीकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

म्हाडा घरासाठी सोडत जारी झाली की, बऱ्याच वेळा दलालांकडून ॲानलाइन अर्ज भरले जात होते. त्यात यशस्वी ठरलेल्या ग्राहकांकडून हे दलाल पैसे उकळत होते. परंतु आताची पद्धत `ओटीपीʼवर आधारित असल्यामुळे प्रत्येक अर्जाला वेगळा मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. त्यामुळे पारदर्शकता येईल, असा दावाही केला जात आहे.

हेही वाचा >>> मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खुणा वागवणाऱ्या नरिमन हाऊसमध्ये साकारत आहे जागतिक दर्जाचे स्मारक-संग्रहालय!

काय असेल ही पद्धत?

⁃ सोडत ॲानलाइन असेल. मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवून त्यानंतरच अर्ज अधिकृत गणला जाईल.

⁃ नोंदणीसाठी फक्त सात दिवसांची मुदत.

⁃ केवळ महत्त्वाची सात कागदपत्रे सादर करणे बंधनकारक. पॅन, आधार, उत्पन्न, जात, अधिवास प्रमाणपत्र आदी.

⁃ नोंदणी संपली की पात्र किंवा अपात्र हे तात्काळ सिद्ध

⁃ तसा संदेश संबंधित मोबाइलक्रमांकावर

⁃ नव्या दिवशी सोडत

⁃ विजयी उमेदवाराला तात्काळ मोबाइलवर संदेश

⁃ ईमेलद्वारे तात्काळ तात्पुरते वितरण पत्र

⁃ तात्पुरते वितरण पत्र बॅंक कर्जासाठीही ग्राह्य

⁃ १८० दिवसांत पैशाचा भरणा. मात्र ज्या दिवशी संपूर्ण भरणा होईल तेव्हा फक्त नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयात जावे लागेल

⁃ ताबा पत्रही ईमेलवरच

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada new proposal for house lottery to curb corruption mumbai print news zws
First published on: 13-10-2022 at 17:35 IST