मुंबई : न्यूरोब्लास्टोमा कर्करोगाने त्रस्त असलेल्या एका १७ वर्षांच्या मुलावर निश्चित असलेले उपचार करण्यात आले. मात्र त्याला पुन्हा न्यूरोब्लास्टोमा कर्करोग झाल्याचे आढळले. त्यामुळे टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी एमआयबीजी इंजेक्शनची उच्च मात्रा जेऊन या मुलाला नवे आयुष्य दिले. अशा प्रकारे एमआयबीजीची उच्च मात्रा वापरून रुग्णांवर उपचार करण्याची भारतातील ही पहिलची घटना आहे.

न्यूरोब्लास्टोमा असलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी केमोथेरपी, शस्त्रक्रिया, ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण, रेडिओथेरपी, ॲण्टी जीडी २ इम्युनोथेरपी आणि डिफरेंशीएशन उपचार पद्धतींद्वारे उपचार केले जातात. यातील ॲण्टी जीडी २ इम्युनोथेरपी ही महाग असल्याने भारतातील रुग्णांना ती परवडणारी नाही. त्यामुळे न्यूरोब्लास्टोमा कर्करेाग असलेल्या रुग्णांवर एमआयबीजी पद्धतीने उपचार केले जातात. यामध्ये रुग्णाला एमआयबीजी इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या शरीरातून, तसेच त्यांच्या विष्ठेतून गॅमा किरण उत्सर्जित होतात. या रेडिएशनच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक असते. हे इंजेक्शन रुग्णाला दिल्यानंतर त्याला विशेष विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे भारतामध्ये एमआयबीजी इंजेक्शनची ३०० मिलिक्युरीज इतकी मात्रा देण्यास अणूऊर्जा नियामक मंडळाने (एईआरबी) मान्यता दिली आहे. मात्र अमेरिकेतील अनेक रुग्णालयांमध्ये यापेक्षा उच्च मात्रा देऊन रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, रुग्णही बरे झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भारतामध्येही न्यरोब्लास्टोमा रुग्णांना एमआयबीजी इंजेक्शनची उच्च मात्रा देण्याचा निर्णय टाटा रुग्णालयाने घेतला. त्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना व एईआरबीची मान्यता घेऊन पुन्हा न्यूरोब्लास्टोमा झालेल्या १७ वर्षीय रुग्णाला ५ मे रोजी ४०० मिलिक्युरीज मात्रा असलेली दोन एमआयबीजीची इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतर त्याला विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांनी रुग्णाला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या अपेक्षेनुसार इंजेक्शन दिल्यानंतर २१ दिवसांनी त्याच्या शरीरातील स्टेम सेल्स कमी झाल्याने २४ व्या दिवशी त्याला ऑटोलॉगस हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स देण्यात आले. त्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. एमआयबीजी इंजेक्शनची उच्च मात्रा देऊन रुग्णांवर उपचार करण्याच्या या पद्धतीचा भारतामध्ये प्रथमच वापर करण्यात आला असून, ती यशस्वी ठरल्याचे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले.

टाटा रुग्णालयातील अणूऔषध विभाग, बालरोग चिकित्सा कर्करोग विभाग, मज्जातंतू प्रत्यारोपण, रक्तसंक्रमण औषध विभागातील डॉक्टर, भौतिशास्त्रज्ञ, परिचारीका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

कसे केले उपचार

एमआयबीजीचे ८०० मिलिक्युरीज मात्रेचे इंजेक्शन देण्यासाठी टाटा रुग्णालयातील डॉक्टरांना तयारी करण्यासाठी साडेतीन महिने लागले. उच्च मात्रेचे इंजेक्शन देण्यासाठी प्रथम न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कर्करोग केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर एईआरबीकडून उच्च मात्रेचे इंजेक्शन देण्याची परवानगी घेण्यात आली. तसेच मॉक ड्रिल करण्यात आले. पुन्हा एकदा अमेरिकेतील तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर रुग्ण व त्याच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. रुग्णावर उपचार करण्यासाठी त्याच्या शरीरातील काही स्टेम सेल्स काढून साठविण्यात आले होते. त्याला २१ दिवसांनी पुन्हा स्टेम सेल्स देताना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली.

काय केली तयारी

एमआयजीबी या पद्धतीमध्ये रुग्णाच्या शरीरातून बाहेर पडणारे रेडिएशन रोखण्यासाठी टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲक्ट्रेक येथे विशेष कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षातील शौचालय व पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र ‘डिलेडीके’ टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीमधील रेडिएशन कमी झाल्यानंतर ते मलजल वाहिनीमध्ये सोडण्यात येते. त्याचप्रमाणे रेडिएशनचा परिणाम डॉक्टर किंवा अन्य कर्मचाऱ्यांवर होऊ नये यासाठी रुग्ण असलेल्या कक्ष व त्याच्या आसपासच्या कक्षातील रेडिएशनची पातळी दररोज गीगर मुलर सर्वेक्षण मीटरद्वारे मोजण्यात येत होती.

महिला डॉक्टरांनी बजावली महत्त्वची भूमिका

एमआयजीबी इंजेक्शनमधून रेडिएशन बाहेर पडत असल्याने रुग्णाला ते देताना फारच काळजी घ्यावी लागते. थोडी जरी चूक झाली तरी इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टरांच्या डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र टाटा रुग्णालयातील डॉ. अर्ची अग्रवाल आणि डॉ. स्नेहा शाह यांनी प्रत्येकी ४०० मिलिक्युरीजच्या दोन मात्रा रुग्णाला दिल्या. हे इंजेक्शन अवघ्या १५ सेकंदात देण्यात आले. तर डॉ. पूजा द्विवेदी यांनी संपूर्ण कक्षामधील रेडिएशनची पातळी मोजण्याचे काम केले.

उपचारासाठी ६ लाख रुपये खर्च

न्यूरोब्लास्टोमा ग्रस्त रुग्णावर उपचार करण्यासाठी टाटा रुग्णाला साधारणपणे सहा ते सात लाख रुपये खर्च आला. यातील जवळपास साडेचार लाख रुपये एमआयजीबी इंजेक्शनसाठी खर्च झाले.