मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून २०२० मध्ये काढण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीतील २६ विजेते थेट अपात्र ठरले आहेत. कागदपत्र जमा न करणाऱ्या २१५ पैकी २६ विजेते गिरण्यांच्या चाळीत वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी घर न देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता प्रतीक्षायादीवरील २६ विजेत्यांना संधी मिळणार आहे.
बाॅम्बे डाईंग, बाॅम्बे डाईंग स्पिंग मिल आणि श्रीनिवास या तीन गिरण्यांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतींमधील तीन हजार ८९४ घरांसाठी १ मार्च २०२० मध्ये सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील विजेत्यांच्या पात्रता निश्चितेचे काम सुरू असून यापैकी २१५ विजेत्यांनी मंडळाकडे कागदपत्रे जमा केलेली नाहीत. तब्बल १०५ दिवस मुदतवाढ देऊनही कागदपत्र जमा न केलेल्या या विजेत्यांना एक शेवटची संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. आतापर्यंत केवळ चार-पाच विजेत्यांनीच कागदपत्रे जमा केल्याची माहिती मुबंई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही शेवटची संधी असल्याने हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजेत्यांनी मुदतीत कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
अखेरची संधी देऊनही कागदपत्रे सादर न करणाऱ्यांच्या जागी प्रतीक्षायादीतील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या संदर्भात तपासणी केली असता २१५ पैकी २६ विजेते गिरण्यांच्या चाळीत वास्तव्याला असल्याचे सिद्ध झाले आहे. चाळीत घर असताना त्यांना गिरणी कामगारांच्या घरांच्या योजनेचा लाभ घेता येत नाही, असे स्पष्ट करीत मंडळाने २६ विजेत्यांना घर न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे यासंबंधीचे जाहीर निवेदन म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
१८५ जणांना कागदपत्र सादर करण्याचे आवाहन
म्हाडाच्या निवेदनानुसार २१५ पैकी २६ जण थेट अपात्र ठरले आहेत. तर आतापर्यंत केवळ चार ते पाच जणांनीच कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे आता १८५ विजेत्यांची कागदपत्रे अद्याप सादर झालेली नाहीत. अंतिम मुदत संपण्यासाठी अंदाजे १५ दिवस आहेत. त्यामुळे १८५ जणांनी ८ सप्टेंबरपर्यंत कागदपत्र सादर करावी, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.