मुंबई : राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टीक- कृत्रिम फुलावर बंदी घालण्याची घोषणाफलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी विधानसभेत केली. महेश शिंदे औचित्याच्या मुद्याद्वारे राज्यात कृत्रिम – प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली. प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
राज्यात अलिकडच्या काळात प्रत्येक समारंभ, मंगल कार्यालय,मंदीरे, उत्सवात प्लास्टीकच्या फुलांचा मोठ्याप्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे फूल शेती करणारा २० -२५ टक्के शेतकरी अडचणीत आला सुमारे अडीच ते तीन हजार कोटींचा व्यवसाय संकटात आला आहे. तसेच फूलशेती संकटात आल्यास मध उत्पादनावरही विपरित परिणाम होईल असे सांगत प्लास्टीक फुलावर तातडीने बंदी घालण्याची मागणी गेल्याच आठवड्या सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती.
फुल उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या आझाद मैदानात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीत कृत्रिम- प्लास्टिक फुलांवर बंदी घाण्याचा निर्णय झाल्याची माहिती गोगावले यांनी दिली. बंदीबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.