मुंबई: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे तेथे पर्यटनासाठी गेलेले राज्यातील १५१ पर्यटक अडकले असून त्यांना सुखरुप परत आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविली आहे. त्यानुसार महाजन डेहराडूनमध्ये दाखल झाले आहेत.
कोणतीही आपत्ती आल्यास गिरीश महाजन तेथे दाखल होतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही महाजन त्याच दिवशी रात्री श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. यामुळेच महाजन हे भाजपचे संकटमोचक मंत्री ओळखले जातात.
उत्तराखंडमध्ये राज्यातील पर्यटक अडकल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील पर्यटकांबाबत आढावा घेतला. बैठकीला मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून पर्यटकांना शोधण्यासाठी आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. राज्यातील १५१ पर्यटक तेथे अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिवांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ढगाळ वातावरणामुळे मोबाईल नेटवर्क आणि बॅटरी चार्जिंग नसल्याने त्यांचा संपर्क होत नाही, संपर्क झाल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याची ग्वाही बर्धन यांनी दिली.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, उत्तराखंडच्या आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, उत्तरकाशी यांच्याशी सातत्याने संपर्कात असून महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाईकांनी काळजी करू नये राजेश कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पर्यटकांना रेल्वे किंवा विमानाने आणण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत आज सर्व पर्यटकांना हर्षील हेलीपॅड येथून गंगोत्री येथे बस, इतर वाहने, पायी आणण्यात येणार आहे. गंगोत्री ते हर्षील हेलीपॅडदरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी १० आयटीबीपी तुकड्या सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम ३० यात्रेकरुंना संरक्षण देणार आहे. शिवाय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद केंद्र, राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र आणि स्थानिक बचाव पथक धराली येथे कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ढगाळ हवामानामुळे संपर्क यंत्रणा व रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. संपर्क व रस्ते पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय आपत्कालिन प्रतिसाद केंद्र नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून अडकलेल्या पर्यटकांचे स्थलांतर अपेक्षित आहे.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून अजूनही ठाणे-५, सोलापूर-४, अहिल्यानगर-१, नाशिक-४, मालेगाव-३, चारकोप कांदिवली-६, मुंबई उपनगर-६ आणि टिटवाळ्यातील दोन पर्यटकांचा शोध लागलेला नाही.