मुंबई: जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी के ला. महाराष्ट्रातील जनतेला दंगलीचे राजकारण आवडत नाही, मात्र भाजपच्या असल्या विनाशकारी राजकारणाचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते, असे मलिक म्हणाले. अमरावती येथे नियोजनबद्ध पद्धतीने दंगल भडकवली गेली, याची चौकशी पोलीस करीत आहेत. मालेगावमधील हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले मुफ्ती इस्माईल हे नगरसेवक  एमआयएममध्ये आहेत, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असा दावा मलिक यांनी के ला.

मलिक-शेलार आरोप-प्रत्यारोप

महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे भाजपचे षड्यंत्र असून, भाजपचे नेते अ‍ॅड. आशीष शेलार यांनी रझा अकादमीच्या कार्यालयात जाऊन बैठक घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी के ला. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी शेलार यांच्या उपस्थितीतील बैठकीचे छायाचित्र दाखविले.  शेलार यांनी मात्र मलिक यांचे आरोप फे टाळून लावले. माझ्या त्या छायाचित्राचा आणि रझा अकादमीच्या छायाचित्राशी संबंध काय, असा सवाल त्यांनी के ला आहे. ती बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्या तरी छायाचित्राचा दाखला देऊन आजच्या दंगलीबाबत आघाडी सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर रझा अकादमीसोबतची अशी असंख्य छायाचित्रे आम्हाला दाखवावी लागतील, तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा शेलार यांनी मलिक यांना दिला.

रझा अकादमीवर बंदी घाला -नितेश राणे

राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांंनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा, अशा मागण्या भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  रझा अकादमीचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर अफवा पसरवीत असताना पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करीत होता , रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी का दिली असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले.