लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबई शहर व उपनगरातील डोंगर उतारांवरील दरडप्रवण भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिल टॉप हट्स पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तुकाराम काते यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
सन २००० ते २०२४ या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मिळून ३८४ दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून, त्यात १६६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ११२ जण जखमी झाले. दरडप्रवण भागांमध्ये ९ मीटरपेक्षा कमी उंचीच्या संरक्षक भिंतींचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) करत असून ९ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भिंतींची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. सद्यस्थितीत बृहन्मुंबईतील अशा ठिकाणी संरक्षक भिंतींचे बांधकाम सुरू आहे.
मुंबईतील दरडप्रवण भागांतील नागरिकांसाठी स्थलांतर आणि सुरक्षितता धोरण तयार केले जात आहे. या धोरणात म्हाडा किंवा एसआरएमार्फत सुरक्षित घरे, स्थानिक परिसरातच पुनर्वसन तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांच्या गरजेनुसार आवश्यक बाबींचा समावेश असणार आहे.असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सभागृहात सांगितले.