मुंबई : गेली अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या चार वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची नेमकी आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसेच भविष्यातील नियोजनासाठी आर्थिक श्वेतपत्रिका तयार करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात ही श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर तसेच सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले, गेल्या ४५ वर्षांमध्ये फक्त आठ वर्षे एसटी महामंडळ काही प्रमाणात नफ्यात होते. दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित दळणवळण सेवा देणारी एसटी भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे, ही काळाची गरज आहे. २०१८-१९ मध्ये एसटीचा संचित तोटा सुमारे ४,६०० कोटी होता. परंतु, करोना महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे व नंतर कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे तो संचित तोटा आता १०,३२२ कोटीपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी सुमारे ३ हजार कोटी रुपयांपर्यंत आहेत.
अर्थात, यासाठी राज्य सरकारने अनुदान स्वरूपात एसटी महामंडळाला मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. एसटीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करेन, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली. तथापि, एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संस्थेचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे, अशा सूचना सरनाईक यांनी यावेळी दिल्या.
गाव तिथे एसटी, रस्ता तेथे एसटी या घोषवाक्यानुसार, एसटी महामंडळाची सेवा जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. परंतु, डोंगरदऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यंत, अनेक ठिकाणी एसटीची सेवा पोहचत नाही. अशा भागांची माहिती घेऊन लवकरच थेट एसटी सेवा सुरू करण्याचा संकल्प आहे. जिथे केवळ रस्ता अरुंद असल्यामुळे ११ मीटर व १२ मीटरच्या मोठ्या बस पोहोचू शकत नाहीत. तिथे खास ५० मिनी बस घेणार आहोत. या मिनी बस चालवणे एसटीच्या दृष्टीने तोट्याचे असले तरी आदिवासी बांधवांसाठी तो तोटा सहन करून त्यांना प्रवासी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.