मुंबई : बंदी असतानाही ‘रॅपिडो’ बाईक टॅक्सी सुरू असल्याने कारवाईचा आदेश देणारे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुत्राच्या पुढाकाराने होत असलेल्या प्रो-गोविंदा लिगसाठी ‘रॅपिडो’ कपंनीचे प्रायोजकत्व घेतल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका घेतली जात आहे. मंत्र्यांनी कारवाईचे नाटक करून प्रायोजकत्व लाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वताः शहरातील रस्त्यांवर बेकायदा ‘रॅपिडो’ (बाईक टॅक्सी) धावत असल्याचे उघडकीस आणून गुन्हे दाखल केले होते. त्याच ‘रॅपिडो’चे प्रायोजकत्व प्रताप सरनाईक फाउंडेशनने ‘प्रो गोविंदा लीग २०२५’ साठी घेतले आहे. सरनाईक यांचा हा प्रताप उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे. .

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पावसाळी अधिवेशनाच्या काळात स्वताः पुढाकार घेऊन रॅपिडो (बाईक टॅक्सी) बेकायदा धावत असल्याचे उघडकीस आणून गुन्हा दाखल केले होते. मात्र, प्रताप सरनाईक फाउंडेशनने आयोजित केलेल्या प्रो गोविंदा लीग २०२५ साठी ‘रॅपिडो’चे प्रायोजकत्व घेतल्याचे समोर आले आहे. शिवाय लीगचे उद्घाटन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत झाले आहे.

या कार्यक्रमाचे फोटो समाज माध्यमावर प्रसारीत करून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केला आहे. ‘कारवाई करण्याचा फार्स करून रॅपिडोचे प्रायोजकत्व मिळविल्या बद्दल परिवहन मंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे. आपल्या कार्यक्रमासाठी पैसे कसे उभे करायचे याचा डेमो महाराष्ट्र सरकारला दाखवला. रॅपिडोवर कारवाई करून स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची आणि अडचणीत आलेल्या या खासगी कंपनीकडून लीगसाठी निधी मिळवायचा. किती छान संकल्पना आहे ना. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट असताना निधी कसा उभा करायचा, याचा आदर्शच प्रतापी मंत्र्यांनी घालून दिला. आपल्या कार्यक्रमासाठी पैसे उभे करण्यासाठी मंत्र्यांना काय काय करावे लागते आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता येणाऱ्या काळात अन्य मंत्र्यांना देखील असाच कारवाईचा फार्स करावा लागेल,’ अशी उपरोधिक टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) सरचिटणीस रोहित पवार यांनाही ‘रॅपिडो बाईक आली. खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली. बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली. मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन प्रायोजकत्व मिळविले. या वरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करते आहे, हे स्पष्ट होते, हा मंत्रीपदाचा गैरवापर तर नाही ना ?, असा सवालही पवार यांनी केला आहे.

प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह

एस.टी. सेवा सुधारण्यात सरनाईक यांना पूर्णपणे अपयश आले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्याने सिटी फ्लो, उबरसारख्या खासगी कंपन्यांच्या सुरू असलेल्या बसेसच्या विरोधात सरनाईक यांनी कारवाईचा बगडा उगारला. रॅपिडोच्या बाईक सेवेच्या विरोधात कारवाईचे नाटक केले. यामुळेच सरनाईक यांच्या एकूणच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.