मुंबईः विधानसभेत केवळ औपचारिकता पार पाडण्यात येतात का, हे केवळ माहिती देण्याचे सभागृह आहे का, कामकाज किती आणि कसे करायचे याची काही पद्धत आहे का, रात्री एकवाजता कार्यक्रम पत्रिका काढण्याची ही कोणची पद्धती अशा प्रश्नांचा भडीमार करीत गुरुवारी मंत्री आणि सत्तारूढ सदस्यांनीच विधानसभा कामकाजाचे वाभाडे काढले.
विधिमंडळाच्या मागिल काही अधिवेशनात लक्षवेधींचा भडीमार होत असल्याने मंत्री आणि सदस्यांनीही वेळोवेळी नाराजी व्यक्त केल्यानंतर यंदाच्या पावसाळी अधिवेशनापासून एका दिवशी जास्तीत जास्त सहा लक्षवेधी सभागृहात चर्चेला घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सकाळी विशेष सत्र आणि नियमित कामकाजाच्या वेळी अशा दोन्ही वेळी किमान १०-१० लक्षवेधी चर्चेला घेतल्या जात असल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असतानाच गुरूवारी सकाळच्या ९ ते ९.४५ दरम्यानच्या विशेष बैठकीसाठी अर्धा तासाच्या चर्चेचे १२ प्रस्ताव आणि १२ लक्षवेधी मांडण्यात आल्या हो्त्या. तर नियमित कामकाजासाठी १३ लक्षवेधींचा कार्यक्रम पत्रिकेत समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे बुधवारी कामकाज संपले तेव्हा विधानसभेचे आजचे विशेष सत्र सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ते नऊ वाजता सुरू झाले, यावेळी सभागृहात सदस्यच हजर नव्हते. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच कार्यक्रम पत्रिकेत दर्शविलेल्या अकरा अर्धा तास चर्चेपैकी केवळ दोनच चर्चा झाल्या, त्यानंतर लक्षवेधी सूचना पुकारण्यात आल्या.
यावेळी सभागृहातील कामकाजावरुन मंत्री आणि सत्तधारी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तब्बल अकरा अर्धा तास चर्चा आणि बारा लक्षवेधी सूचना सकाळच्या विशेष सत्रातील पावणे दोन तासात घेणे शक्य आहे का असा सवाल सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित केला. रात्री बारा साडेबारा वाजता आम्हाला लक्षवेधी सूचना मिळाल्या. त्यावर ब्रिफिंग कधी घ्यायचे. आम्हालाही दोन्ही सभागृहांची जबाबदारी असते. अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला वेळ नको का, वेळेचे काहीतरी बंधन हवे ना. आता इथेच राहायची व्यवस्था करा अशी उद्विग्न सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. तर रात्री एक वाजता कार्यक्रम पत्रिका येते. त्यानंतर कधी तयारी करायची अशी विचारणा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली. तर इथे काय फक्त औपचारिकता पूर्ण करायची का,आम्ही टीकमार्क करायला, विषय पत्रिकेवर नाव यायला प्रश्न टाकतो का. असा सवाल संजय केळकर, योगेश सागर यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच आता सदस्यांचे संरक्षण करावे अशी विनंती सदस्यानी केली. मात्र त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. यावर अध्यक्षांशी बोलून निर्णय घेतला जाईल असे सांगत पिठासन अधिकारी समीर कुणावार यांनी वेळ मारून नेली.
विरोधकांकडूनही नाराजी
विधानसभेत सरकार बहुमताच्या ताकदीवर कामकाज रेटून नेत आहे. नियमात कामकाज केले जात नाही. विरोधकांना बोलू दिले जात नाही असा आरोप करीत विरोधकांनीही अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. शिवसेना(ठाकरे) गटाचे गटनेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर आक्षेप घेत बोलू देण्याची विनंत अध्यक्षांना केली. मात्र हा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला असल्याने केवळ त्यांनाच राईट टू रिप्लायची संधी असेल असे सांगत नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना बोलण्याची अनुमती नाकारली. त्यावर संतप्त झालेल्या जाधव यांनी हातवारे करीत अध्यक्षांशी हुज्जत घातली. आदित्य ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांशी हुज्जत घातली. यामुळे सभागृहात गोंधळ झाल्याने दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू होताच जाधव आणि ठाकेर यांनी अध्यक्षांचा अवमान केला असून त्यांचे निलंबन करण्याची मागणी शंभूराज देसाई यांनी केली. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनीही विरोधकांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत यापूर्वी जसे कामकाज झाले तसे आता होणार नाही. नियमानुसारच कामकाज चालेल. आपल्याला योग्य वाटत असेल तर अध्यक्षांच्या आसनाचा अवमान करा. पण नियमबाह्य कामकाज होऊ देणार नाही असा इशारा नार्वेकर यांनी दिला.