मुंबई : कांदिवलीमधील एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी पुण्यात सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. दीड वर्षात तीन वेळा बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पीडित मुलीने केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी समतानगर पोलीस ठाण्याचे पथक पुण्याला रवाना झाले आहे.
पीडित तरूणी अल्पवयीन असताना कॅटरिंगमध्ये काम करीत होती. तिच्यावर बलात्काराची पहिली घटना २०२४ मध्ये घडली. तिच्या जुजबी परिचयाच्या तरुणाने तिला १ जानेवारी २०२४ रोजी नवीन वर्षाच्या पार्टीसाठी घरी बोलावले होते. तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांनी तो तिला कॅटरींगचे काम मिळवून देतो असे सांगून पुण्याला घेऊन गेला. तेथे देखील त्याने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. कुणाला हा प्रकार सांगितल्यास छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे मुलगी घाबरली होती.
पुण्यात दोघांनी केला सामूहिक बलात्कार
दीड महिन्यांपूर्वी आरोपी तिला पुन्हा आपल्या गाडीतून पुण्याला घेऊन गेला. तेथे एका बंगल्यात तिला नेण्यात आले. यावेळी आरोपीचा आणखी एक मित्र तेथे होता. या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यावेळी तिची आणखी अश्लील छायाचित्रे काढली. अखेर पीडित मुलीने समता नगर पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राविरोधात कलम ६४ (२), ६४ (२) (ड), ७० (१) पोक्सो ८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पुण्यात
पीडित मुलीवर मागील वर्षी कांदिवलीत पहिल्यांदा बलात्कार झाला होता. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याने पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. तिला आरोपीचे फक्त नाव माहीत आहे. दुसऱ्या आरोपीला ती ओळखत नाही, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पुण्यातील ज्या बंगल्यात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, ती जागा मात्र तिला माहीत आहे. दुसरा आरोपी पुण्यातील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे पथक तिला घेऊन आरोपीच्या शोधासाठी पुण्याला गेले आहेत. पुण्यातून आरोपींबाबत काही सुगावा लागू शकेल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.