मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेअंतर्गत मिरा-भाईंदरदरम्यान द्विस्तरीय पूल बांधला आहे. या पुलाचे लोकार्पण ऑगस्ट २०२४ मध्ये करण्यात आले होते. मात्र वर्षभरातच या पुलाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. पुलावर खड्डे झाले असून पुलावर पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत असून अपघातांची भीती वाढली आहे.
वर्षभरातच पुलाची दूरवस्था झाल्याने काम निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर याची गंभीर दखल घेऊन कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली आहे. दरम्यान, पुलावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला एमएमआरडीएने सुरुवात केली आहे.
मेट्रो ९ मार्गिका प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शन मार्गावरून जात आहे. या परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो ९ मार्गिकेअंतर्गत द्विस्तरीय पूल बांधला आहे. १ किमी लांबीचा आणि ५.५ मीटर उंचीचा हा पूल ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या थाटामाटात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र हा पूल वाहतुकीस खुला होऊन वर्ष होत नाही तोच या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहे.
जुलै-ऑगस्टपासून पुलावर खड्डे पडले असून दुसरीकडे पुलावर काही ठिकाणी पावसाचे पाणीही साचत आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही. खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताची भीती वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच याविषयी स्थानिक रहिवासी ॲड. कृष्णा गुप्ता यांनी एमएमआरडीएकडे लेखी तक्रार केली आहे. वर्षभरात पुलावर खड्डे पडल्याने पुलाचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप करीत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तर याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही गुप्ता यांनी केली आहे.
द्विस्तरीय पुलावर वर्षभरात खड्डे पडल्याचे, तसेच पाणी साचत असल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर खड्डे पडलेला भागाची कायमस्वरूपी आणि योग्य प्रकारे दुरुस्ती केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या प्रकारची गंभीर दखल घेण्यात आली असून सल्लागाराकडून लवकरच पुलाची योग्य ती तपासणी करण्यात येणार असेही त्यांनी सांगितले. मात्र कंत्राटदाराविरोधातील कारवाईबाबत उच्च स्तरावरच निर्णय होईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तर एमएमआरडीए, कंत्राटदाराकडून केवळ मलमपट्टी केली जात आहे. खड्डे बुजवले की पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यातून काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कंत्राटदाराविरोधात आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी गुप्ता यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी केली आहे.