मुंबई : मागील एक आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह वडाळा येथील एका इमारतीच्या टाकीत आढळला आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृत इसम तेथे कसा पोहोचला? त्याचा मृत्यू नैसर्गिक की घातपात आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

वडाळा पूर्वेच्या भक्ती पार्क येथे एमएमआरडीए वसाहत आहे. रविवारी दुपारी येथील ११ क्रमांकाच्या इमारतीच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना दुर्गंधी येत होती. त्याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना कळविण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन टाकीतून मृतदेह बाहेर काढला आणि तो पोलिसांच्या ताब्यात दिला. नंतर पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी लोकमान्य टिळक (शीव) रुग्णालयात पाठवला.

एक आठवड्यापासून बेपत्ता होता

वडाळा टीटी (ट्रक टर्मिनस) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीचे नाव सुरेश तंगावेल देवेंद्र (३५) असून तो याच परिसरात असलेल्या म्हाडाच्या इमारत क्रमांक ५ मध्ये राहत होता. देवेंद्र मागील रविवार पासून बेपत्ता होता. त्याबाबत त्याच्या कुटुंबियांनी वडाळा टीटी पोलिसांकडे तक्रारही केली होती. तो पाण्याच्या टाकीत पडला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला ते स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आम्ही अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्ती घटनास्थळी कशी पोहोचली आणि त्याच्यासोबत कोणी होते का? हे तपासण्यासाठी आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.