नदीच्या पाण्याची गुणवत्ता २० पटीने ढासळली
२६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या प्रलयंकारी पावसानंतर चर्चेचा विषय ठरलेल्या मिठी नदीभोवती मानवनिर्मित प्रदूषणाची मगरमिठी आणखी घट्ट होऊ लागली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ‘नॅशनल वॉटर मॉनेटरिंग प्रोजेक्ट’अंतर्गत दर महिन्याला करण्यात येणाऱ्या मिठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्ता तपासणीत, गेल्या तीन महिन्यांत नदीच्या प्रदूषणात मर्यादित प्रमाणापेक्षा वीसपट वाढ झाल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे, पावसाळय़ात नदीच्या पाण्याची गुणवत्ता बऱ्यापैकी सुधारत असून पावसाळय़ानंतर मात्र नदीचे प्रदूषण पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
साधारण १५ किलोमीटर लांबीची मिठी नदी पवईमधील विहार तलावामधून उगम पावत कुर्ला, साकीनाका, कलिना आणि वाकोलामार्गे अरबी समुद्राला माहीमच्या खाडीत येऊन मिळते. या मार्गात ‘के-पूर्व’ विभागातील श्रद्धानंद, लेलेवाडी, ओबेरॉय आणि कृष्णनगर, ‘एल’ विभागातील जरीमरी आणि ‘एच-पूर्व’ विभागातील वाकोला हे नाले मिठी नदीच्या मुख्य प्रवाहाला येऊन मिळतात. या नाल्यांलगत आणि मिठीच्या पात्रालगत असणाऱ्या वस्ती आणि औद्योगिक संस्थांमधून मोठय़ा प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जाते. परिणामी, मिठीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘नॅशनल वॉटर मॉनिटरिंग प्रोजेक्ट’अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत याला दुजोरा मिळाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला दर महिन्याला नदी आणि समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता तपासावी लागते. आणि त्याचा अहवाल केंद्रीय यंत्रणेला द्यावा लागतो.
यंदा जानेवारी ते मार्च महिन्यात करण्यात आलेल्या मिठी नदीच्या गुणवत्ता चाचणीत ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ (बीओडी) मर्यादित प्रमाणापेक्षा वीस पटीने वाढल्याची नोंद आहे. तर पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाणही मर्यादित प्रमाणापेक्षा कमी झाल्याची नोंद गेल्या तीन महिन्यांमध्ये करण्यात आली आहे. ‘सीपीसीबी’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार नदी-समुद्राच्या पाण्यामध्ये बीओडीचे प्रमाण हे लिटरमागे ३ मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास ते मानवी आरोग्याला आणि ६ मिलीग्रॅमपेक्षा अधिक असल्यास पाण्यातील मत्स्य जैवविविधतेला धोकादायक आहे. तसेच पाण्यामधील ऑक्सिजनचे प्रमाण लिटरमागे ४ मिलीग्रॅम एवढे असणे आवश्यक आहे. तसे नसल्याचे पाणी प्रदूषित असल्याचे निर्देश ठरविले जातात. तपासणीनुसार मिठीच्या पाण्यात बीओडीचे प्रमाण जानेवारी महिन्यात ३४ मिलीग्रॅम, तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रत्येकी ६० मिलीग्रॅम म्हणजे मर्यादेपेक्षा वीसपट होते.
उपाययोजनांचा अहवाल प्रक्रियेत
सर्वोच्च न्यायालयाने मिठी नदीच्या संवर्धनासाठी गठित केलेल्या तज्ज्ञ संस्थांच्या समितीअंतर्गत नदीचा पुनरु ज्जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल न्यायालयाकडे सुपूर्द केल्याची माहिती पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांनी दिली. मात्र न्यायालयासमोर हा अहवाल सादर झाला नसून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहवालाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच मिठी नदीच्या पात्रालगत बसविण्यात येणाऱ्या मलजल प्रक्रिया केंद्रासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला कंत्रादाराकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने येत्या दहा दिवसांमध्ये पुन्हा निविदा प्रक्रियेसाठी जाहिरात देणार असल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली.
पावसाळय़ात अधिक शुद्ध
पावसाळ्यात मिठी नदीच्या पाण्यामधील प्रदूषणाचे प्रमाण तुलनेत कमी होत असल्याचे या आकडीवारीनुसार स्पष्ट होत आहे. जून ते सप्टेंबर (२०१७) या पावसाळी हंगामात बीओडीचे प्रमाण ७ मिलीग्रॅम ते ६ मिलीग्रॅम एवढे होते. त्यानंतर पावसाळा संपताच ऑक्टोबरपासून हे प्रमाण दहा पटीने वाढल्याची नोंद आहे.