मुंबई : धारावी जंक्शनवरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जलदगतीने जाता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. तर सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत वाकोला – पानबाई शाळा उड्डाणपुलाचेही कामही पूर्ण झाले आहे. मात्र केवळ लोकार्पणासाठी मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले केले जात नसल्याचा आरोप स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे.

पूल तयार असतानाही केवळ ते वाहतूक सेवेत दाखल नसल्याने वाहनचालक-प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या १० दिवसांत दोन्ही पूल एमएमआरडीएने वाहतुकीसाठी खुले करावे, अन्यथा आम्ही हे पूल खुले करू, असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल आणि कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कलानगर जंक्शन येथे तीन उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले होते. तीनपैकी दोन पुलांचे काम पूर्ण होऊन ते वाहतूक सेवेत दाखल झाले आहे. आता धारावी जंक्शन ते वांद्रे-वरळी सागरी सेतू पुलाचे कामही काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र हा पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. पूल पूर्ण असतानाही केवळ लोकार्पणासाठी मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत वरुण सरदेसाई यांनी २ जुलै रोजी पुलावरील रस्ता रोधक हटवत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. या पुलावरून काही वेळ वाहने धावली. मात्र वरुण सरदेसाई परतल्यानंतर एमएमआरडीएने तात्काळ हा पूल बंद केला.

पुलावरील वीज जोडणी अपूर्ण असून रात्रीच्या वेळी अंधारात अपघात झाल्यास कोण जबाबदार असा मुद्दा उपस्थित करीत एमएमआरडीएने हा पूल बंद केला असून तो अजूनही बंदच आहे. पण आता मात्र या पुलावरील वीज जोडणी पूर्ण झाली आहे. विजेचे दिवे दिसत आहेत. मग आता एमएमआरडीए कशाची वाट पाहत आहे. हा पूल दहा दिवसात खुला करावा, असा इशारा त्यांनी एमएमआरडीएला दिला आहे. कलानगर जंक्शन येथील पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचा असा अमर महल ते पश्चिम द्रुतगती मार्ग प्रवास केवळ ३० ते ३५ मिनिटात पार करण्यासाठी एमएमआरडीएने हाती घेतलेला वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्ताही पूर्ण झाला आहे. मात्र हा पुलही केवळ मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने वाहतुकीस खुला केला जात नसल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे.

दोन्ही प्रकल्पांबाबत मी सातत्याने एमएमआरडीएकडे पाठपुरावा करीत आहे. उड्डाणपूल आणि उन्नत रस्ता केव्हा खुला होणार याची विचारणा करीत आहे. विधान सभेतही हा प्रश्न उपस्थित केला. पण अद्यापही दोन्ही प्रकल्प खुले होत नसल्याने प्रवासी, वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत हे दोन्ही प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल केले नाहीत तर मी आणि आमचे कार्यकर्ते जाऊन पूल आणि उन्नत रस्ता खुला करू, असा इशारा त्यांनी एमएमआरडीएला दिला आहे.

याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता दोन्ही प्रकल्पांतील काही कामे शिल्लक आहेत, ती कामे पूर्ण झाल्यानंतरच दोन्ही प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल केले जातील असे सांगितले. वरुण देसाईंनी मात्र एमएमआरडीए चुकीची माहिती देत असून दोन्ही प्रकल्पांचे १०० टक्के काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ ऑगस्टला लोकार्पण ?

कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूल आणि वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्त्याच्या लोकार्पणासाठी मंत्र्यांची वेळ घेण्याचे प्रयत्न एमएमआरडीएकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचवेळी १५ ऑगस्ट रोजी या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.