मुंबई आणि परिसरातील भविष्यातील विविध मेट्रो प्रकल्पांमुळे होणारी हानी भरून काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत या वर्षीच्या पावसाळ्यात ५१ हजार १५१ झाडे लावण्यात आली. शिळफाटा आणि टिटवाळा येथील ठाणे वन विभागाच्या एकूण ४६ हेक्टर जागेवर ऑगस्टपासून या वृक्षारोपणास सुरुवात झाली. मंगळवारी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते डायघर नजीकच्या जागेवर ५१,१५१ वे झाड लावण्यात आले.

एमएमआरडीए, ठाणे वनविभाग आणि महाराष्ट्र वन विकास मंडळ यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार वनविभागाच्या ४६ हेक्टर जमिनीवर हे वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक झाडामागे १,२२८ रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यामध्ये तीन वर्षांपर्यंतचा जोपासनेचा खर्चाचा समावेश आहे. शिळफाटय़ानजीकच्या डायघर पोलीस ठाण्याजवळील ३६ हेक्टर जागेवर ४१ हजार १५१ झाडे, तर कल्याणजवळील १० हेक्टर जागेवर १० हजार झाडे लावण्यात आली आहेत.

भविष्यात मुंबई आणि महानगर परिसरात सर्व मेट्रो मार्गिकांसाठीच सुमारे सात हजारांच्या आसपास वृक्षतोड होणार आहे. ती हानी भरून काढण्यासाठी प्राधिकरणाने प्रचंड मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वृक्षप्रेमींना प्रति वर्ष ५०० रुपये देऊन एका झाडाचे पालकत्व घेता येईल, तसेच त्या झाडाला त्याचे नाव देखील देण्यात येईल. बकुळ, पिंपळ, कडुनीम, कांचन, जांभूळ, कदंब, करंज अशा विविध झाडांचा यामध्ये समावेश आहे.

पर्यावरणाच्या समस्यांबाबत आम्ही सजग आहोत. पायाभूत सुविधांच्या मोठय़ा प्रकल्पांसाठी झाडे तोडावी लागण्याबाबत आम्ही संवेदनशील आहोत, पण त्याचबरोबर या प्रकल्पांचा पर्यावरणासदेखील फायदा होणार आहे. आर. ए. राजीव , प्राधिकरण, महानगर आयुक्त