मुंबई : मागील काही महिन्यांपासून ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच दैनंदिन प्रवासी संख्येने ३ लाखांचा टप्पा पार केल्यानंतर आता १६ सप्टेंबर रोजी या दोन्ही मार्गिकांवरून ३ लाख ४० हजार ५७१ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही आतापर्यंतची या मार्गिकेवरील सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे.
‘मेट्रो २’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका दोन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल झाल्या आहेत. या मार्गिका २०२२ मध्ये सेवेत दाखल झाल्यापासून २०२४ पर्यंत प्रवाशांकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रवासी संख्या वाढविण्यासाठी काही प्रयत्न केले आणि त्यातून वर्षभरापासून प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर काही महिने या मार्गिकेवरून प्रतिदिन केवळ ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. पण त्यानंतर मात्र प्रवाशांची संख्या वाढत गेली. त्यामुळेच आजघडीला प्रतिदिन सुमारे तीन लाख प्रवासी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरून प्रवास करीत आहेत. तर एक-दोन वेळा दैनंदिन प्रवासी संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला होता. ८ ऑगस्ट २०२४ रोजी २ लाख ६९ हजार २३० अशी विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्या नोंदवली गेली होती. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी २ लाख ९२ हजार ५७५, १८ जून २०२५ रोजी २ लाख ९४ हजार ६८१, २४ जून २०२५ रोजी २ लाख ९७ हजार ६०० इतकी विक्रमी प्रवासी संख्या नोंदविण्यात आली होती.
दैनंदिन प्रवासी संख्येने जुलै २०२५ मध्ये ३ लाखांचा टप्पा पार केला होता. या मार्गिकांवरून ८ जुलै २०२५ रोजी ३ लाख १ हजार १२७ इतकी दैनंदिन प्रवासी संख्या नोंदविण्यात आली. तर १५ जुलै २०२५ रोजी ३ लाख ११ हजार ३०५ प्रवाशांनी या मार्गिकांवरून प्रवास केला होता. ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या होती. या मार्गिकांवर १६ सप्टेंबर ३ लाख ४० हजार ५७१ प्रवाशांनी प्रवास केला असून आतापर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे.