मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेच्या कामासाठी कांजुरमार्गदरम्यान खांब उभारण्यात आले आहेत. मात्र आता यातील काही खांब पाडण्यास एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. मेट्रो ६ मार्गिकेच्या संरखेनात कारशेडच्या अनुषंगाने काही बदल करण्यात आल्याने खांब पाडण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे. अचानक संरेखनात बदल करण्यात आल्याने खांबांच्या उभारणीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी १५.३१ किमी लांबीची आणि १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रो ६ मार्गिकेची उभारणी एमएमआरडीए करीत आहे. ही मार्गिका मार्च २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या मार्गिकेचे आतापर्यंत ९० टक्के बांधकाम (सिव्हिल वर्क) पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यातील १० टक्के काम पूर्ण झाले आहे.
आता नुकतेच विविध यंत्रणांच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. कारशेडसाठीच्या जागेचा वाद सुटलेला नाही. कारशेडच्या कामाचे कंत्राट अंतिम होऊनही हे काम मार्गी लागलेले नाही. आता या मार्गिकेसाठी कांजूरमार्ग येथे उभारलेल्या काही खांबांचे पाडकाम एमएमआरडीएने सुरू केले आहे.
याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता, मेट्रो ६ च्या संरेखनात काही बदल करण्यात आल्याने मार्गिका आता काहीशी वळविण्यात आली आहे. त्यामुळे काही खांब पाडण्याची वा काही खांबाच्या पायाचा (फाऊंडेशन) वापर करून मार्गिका काहीशी इतरत्र वळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मेट्रो ६ मार्गिकेतील कारशेडचे नियोजन कांजूरमार्ग येथे पूर्वेकडील द्रुतगती महामार्गालगत होते. त्यानुसार उन्नत मार्गिकेला कारशेड जोडण्यासाठी, मेट्रो मार्गिकेचा ट्रॅक कारशेडमध्ये नेण्यासाठी काही खांबांचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र आता कारशेडचे प्रवेशद्वार ठाण्याच्या दिशेला हलविण्यात आले आहे.
त्यामुळे संरेखनात काहीसा बदल करावा लागल्याने कांजूरमार्ग येथे बांधण्यात आलेले काही खांब पाडण्याची वा त्यांची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार कामास सुरुवात झाल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. मेट्रो ६ मार्गिकेत उभारण्यात आलेले खांब पाडण्यात येत असल्याने त्यांच्या उभारणीसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्यामुळे टीका होत आहे.