डोंबिवलीला ठाण्याशी जोडण्यासाठी महत्त्वाचा असलेला डोंबिवलीतील मोठागाव आणि माणकोली दरम्यानचा सहापदरी पूल बांधण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतले आहे. तीन वर्षांत हा पूल पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा पूल खाडीवरून जाणार असून त्याची लांबी १२६६ मीटर असेल. मुंब्रा-डोंबिवली-भिवंडी रस्त्यालगत हा पूल बांधण्यात येईल. या पुलामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र जोडले जाईल. या पुलासाठी अद्याप भूसंपादन व्हायचे आहे. मात्र तरीही खाडीपूल उभारण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याचा ‘एमएमआरडीए’चा दावा आहे. पूर्वी ठाणे-डोंबिवली जोडण्यासाठी रेल्वे मार्गालगत पूल बांधण्याचा प्रस्ताव होता. पण पर्यावरणाच्या अडचणींमुळे ते शक्य झाले नाही.