‘हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल्स’च्या मालकीची जागा खरेदी करण्यास मंजुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ‘हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल्स’ या सरकारी कंपनीच्या मालकीची पनवेलनजीकच्या रसायनी येथील बंद असलेल्या प्रकल्पाची सुमारे ५९१ एकर जागा खरेदी करण्यास ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’स मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात जेएनपीटी, पनवेल परिसरात होणाऱ्या अनेक पायाभूत सुविधांच्या जाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणासाठी महत्त्वाची गुंतवणूक ठरणार आहे.

हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल्स ही सरकारी मालकीची कंपनी गेले काही वर्षे तोटय़ात आहे. कंपनीच्या पुनर्रचना योजनेंतर्गत रसायनी येथील प्लांट बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मे २०१७ मध्ये घेतला. कंपनीचा कोची येथील प्लांट कार्यरत ठेवण्याचे त्या वेळी ठरले होते. पुनर्रचना योजनेनुसार रसायनी येथील प्लांटमधील यंत्रसामग्रीची विल्हेवाट लावणे, कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती आणि प्लांटची जागा विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या कंपनीचे निर्गुतवणुकीकरण करण्याची योजना आहे. यापैकी काही जागा बीपीसीएलला विकण्याचे २०१९ मध्ये प्रस्तावित होते.

प्राधिकरणाची १४९वी बैठक मंगळवारी अध्यक्ष तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाद्वारे पार पडली. या बैठकीत हिंदुस्तान केमिकल्सची जागा विकत घेण्यास मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनंतर  प्राधिकरणामार्फत सुमारे ५९१ जागेसाठी स्वारस्य असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. येथील अर्ध्या जागेवर अतिक्रमणे असून त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून ही जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे.

भविष्यात पनवेल, जेएनपीटी, पनवेल परिसरात पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. नवी मुंबई विमानतळ, कोकण एक्स्प्रेस वे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, बडोदा मुंबई द्रुतगती मार्ग यापैकी काही प्रकल्पांची कामे सुरू असून काही प्रकल्प पुढील दहा वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. जेएनपीटी ते रसायनी हे अंतर केवळ ४० किमी आहे, तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडमुळे शिवडी ते रसायनी हे अंतरदेखील कमी होणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर रसायनी येथील जागेला औद्योगिक वापरासाठी मोठी मागणी निर्माण होऊ शकते. या जागेचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात येईल याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. प्राधिकरणाच्या या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकातील भव्य स्मारकाच्या पुतळ्याच्या उंचीच्या वाढीस (४५० फूट) मान्यता देण्यात आली.

या प्रस्तावांना मान्यता

भविष्यात निर्माण होणाऱ्या ३३७ किमी मेट्रोच्या विविध स्थानकांभोवती असलेल्या खासगी विकासकामांना थेट जोडणी धोरण, महावीर नगर ते गोराई रोपवे मधील मार्गिका बदल, मेट्रो २ ए आणि ७ मार्गिकांवरील बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरणाच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. तसेच मुंबई महानगर एकात्मिक तिकिटीकरण पद्धतीच्या अंमलबजावणीच्या सुधारित प्रस्तावास मान्यता मिळाली असल्याने भविष्यात विविध परिवहन सेवांचा लाभ सुलभपणे घेणे प्रवाशांना शक्य होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda to buy 591 acres land of hindustan organic chemicals zws
First published on: 09-07-2020 at 02:05 IST