मुंबई: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले…
“काल विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?’

सत्ता हे साधन असावं, साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’

मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनही केली सरकारवर टीका

मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्यांच्यावर आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?

अधिवेशनाचा दिवसाचा खर्च दोन कोटी

अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रूपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये… सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्यांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही.

माध्यमांवरही टीका

माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की, या भंपक प्रकरणांमध्ये तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वत:च्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्यांना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.

दरम्यान, विधीमंडळ परिसरातील हाणामारीच्या घटनेचं सीसीटीव्ही छायाचित्रण तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचा अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.