मनसेचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसर, रुग्णालये, धार्मिक स्थळे तसेच शाळांच्या आसपास फेरीवाल्यांना बसू देऊ नये असे आदेश दिल्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा सपाटा मुंबई, ठाणे व पुण्यात पोलिसांनी लावला आहे असा आरोप मनसेने केला आहे.
ठाण्यात तर मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांवर चॅप्टर के सेसनुसार एक कोटी रुपयांचा जामीन मागण्यात आला असून अन्य पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येकी २५ लाख रुपयांचे जामीन पोलिसांनी मागितले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पोलिसांची ही मनमानी कारवाई सुरू असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
न्यायालयाचा आदेश व माझे पत्र दिल्यानंतर ज्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले दिसतील तेथील पोलीस अधिकारी व पालिका अधिकाऱ्यांवर अवमान याचिका दाखल केली जाईल, या राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळेही अधिकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
फेरीवाल्यांकडून मिळणारे कोटय़वधी रुपयांचे हप्ते बंद झाल्याने अधिकारी मनसेवर राग काढत आहेत, तर परप्रांतीय मतदारांवर डोळा ठेवून पोलिसांच्या माध्यमातून मनसेचा आवाज दाबण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मात्र हा लढा यापुढेही सुरूच राहील, असे नांदगावकर यांनी सांगितले.