जनक्षोभानंतर मनसेचा वादग्रस्त फलक हटवला
‘नागरिकांनो, आपले स्वागत आहे,’ अशा प्रकारचा फलक लावून एखादा तुमचे सहर्ष स्वागत करत असेल, तर तुम्हाला आनंदच होईल. पण हाच फलक जर स्मशानभूमीजवळ लावला असेल, तर रागाचा पारा चढल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांच्या मनसेने काशिमीरा येथील स्मशानभूमीजवळ अशाच प्रकारचा फलक लावल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. त्यानंतर अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा वादग्रस्त फलक उतरविला.
मीरा रोडजवळील काशिमीरा येथील पालिकेच्या मोक्ष स्मशानभूमीवर मनसेने आपल्या सर्वाचे जाहीर स्वागत अशा आशयाचा फलक लावला होता. त्यावरून पक्षावर टीका होऊ लागली. त्यामुळे तो फलक काढून टाकला. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी हा पक्षाला बदनाम करण्याचा खोडसाळपणा असल्याचे सांगितले. हा फलक गेल्या पाच वर्षांपासून आहे. या स्मशानभूमीजवळून डोंगरी गावात जाण्यासाठी एक रस्ता आहे. तेथील नागरिकांसाठी हा फलक लावला. कुणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या आणि चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून हा फलक काढल्याचे त्यांनी सांगितले.
हा फलक स्मशानातील लोकांसाठी नव्हता तर तेथून जाणाऱ्या रस्त्यावरील नागरिकांसाठी होता. पक्षाला बदनाम करण्यासाठी काही जण हा खोडसाळपणा करत आहेत.
– अरुण कदम, मनसे जिल्हाध्यक्ष, मीरा रोड
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘स्मशानात आपले सहर्ष स्वागत!’
जनक्षोभानंतर मनसेचा वादग्रस्त फलक हटवला
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 27-10-2015 at 07:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns controversial banner removed from cemetery