महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच या मुद्द्यावरुन आता राज्यात ठाकरे विरुद्द ठाकरे असा संघर्ष दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या भोंग्यांच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत बिनकामाचे भोंगे असं म्हटलं आहे. मात्र आता या टीकेवरुन मनसेकडून पहिला प्रतिक्रिया आली असून मनसेनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेची आठवण उद्धव यांना करुन दिलीय.

नक्की वाचा >> “…म्हणून राऊतांना राज ठाकरे ‘लवंडे’ म्हणतात”; ‘शरद पवाराला शरम वाटत नाही?’ म्हणणारा बाळासाहेबांचा Video शेअर करत मनसेचा टोला

उद्धव नेमकं कुठे आणि काय बोलले?
प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रक्कमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सुविधेचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणा दांपत्यावर निशाणा साधला.

मनसेला अप्रत्यक्ष टोला…
“ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे, जळजळतंय, मळमळतंय काही कळत नाही. पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये, शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा अंगीकारुन दाखवला आहे हे दाखवावं असं माझं आव्हान आहे. काम काहीच नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग असून मी काडीची किंमत देत नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला.

नक्की वाचा >> कसा असणार राज यांचा औरंगाबाद दौरा?; ‘शिवतिर्थ’वरील बैठकीनंतर मनसे नेता म्हणाला, “राज ठाकरे मुंबईहून पुण्याला…”

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही टोला
“हिंदुत्व सोडल्याची गेले काही दिवस माझ्यावर टीका होत आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का, घालावे आणि मग सोडावे. जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं आहे? बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. राममंदिर बांधण्याचा निर्णयदेखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही तर कोर्टाने दिला आहे. मंदिर बांधतानाही तुम्ही झोळ्या पसरल्या आहेत, मग तुमचं हिंदुत्व कुठे आहे?,” अशी विचारणा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.

बिनकामाचे भोंगेवरुन मनसेचं उत्तर…
औरंगाबादमधील मनसेच्या एक मे रोजी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर आज ‘शिवतिर्था’ या राज ठाकरेंच्या निवसास्थानी मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी बिनकामाचे भोंगे म्हणत राज यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सरदेसाई यांनी, “बाळासाहेब ठाकरेंची एक क्लिप माझ्या नजरेसमोर आली. त्याबद्दल (भोंग्यांबद्दल) बाळासाहेबांची भूमिका फार वेगळी होती,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे बोलताना, “त्यामुळे त्यांनी ते बघावं आणि त्यापद्धतीची भूमिका घ्यावी. म्हणजे आता जो चाललाय तो गोंधळ होणार नाही कादाचित. वैचारिक गोंधळ झालाय का मला कल्पना नाही,” असंही सरदेसाई म्हणाले.

कोणती क्लीप?
नितीन सरदेसाई यांनी थेट कोणती क्लीप हे सांगितलं नसलं तरी सध्या सोशल मीडियावर बाळासाहेबांची एक जुनी क्लीप व्हायरल होत असून एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातही ती दाखवण्यात आलेली. ही क्लिक १९९४ सालची असून यामध्ये बाळासाहेबांनी भोंग्याविरोधातील भूमिका जाहीर भाषणात बोलून दाखवलेली. मनसेनं ही क्लीप शेअर केली होती.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे एका भाषणादरम्यान शरद पवार आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारवर मशिदींसंदर्भातील एका निर्णयावरुन टीका करताना दिसत आहेत. “ती मी सरपोतदारांना सांगणार आहे की, तुमची एक केस कोर्टात नुसती पडून आहे. ती म्हणजे मशिदीवरचे लाऊडस्पीकर्स. हे केव्हा खाली उतरवायचे. कोलकाता हायकोर्टाने निर्णय देऊन टाकलाय की उतरवा, पहिले खाली उतरवा. त्यांनी खाली उतरवले. पण भयानक बातमी हे करत असताना दुसरी येऊन थडकली. ती बातमी कोणती ते सांगतो. ज्या आपल्या महाराष्ट्र सरकारची सुंता झालेली आहे त्यांनी फतवा काढलेला आहे. तो फतवा असाय शरम वाटते, मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालच तर किती पेन्शन येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे पाठवलाय. चॅरिटी कमिशनरकडे हा फतवा आलेला आहे की लिहून द्या सगळ्या मशिदींमध्ये किती इमाम आहेत. असेल तर त्यांना पेन्शन द्यायचं झाल्यास किती पैसा खर्च करता येईल याची माहिती त्यांनी मागवलीय, महाराष्ट्र सरकारनं. या शरद पवाराला शरम वाटत नाही? तुम्ही तरी कसे मुडदाडासारखे बसणार आहात. कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये गाडायचीच,” असं बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात म्हणताना दिसत आहेत.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं घडलंय काय

ते बोलतात एक करतात एक…
आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं सांगण्यात आलं तेव्हा नितीन सरदेसाईंनी ठाकरे सरकावर निशाणा साधला. “ते काय म्हणतायत मला माहिती नाही पण आमच्यासारख्या हिंदुत्ववादी लोकांना आणि संस्थांना सरकार आणि प्रशासनाची वागणूक मात्र फार वेगळी मिळतेय. त्यामुळे ते बोलतायत एक आणि प्रत्यक्षात करतायत मात्र काहीतरी वेगळं,” असं सरदेसाई म्हणाले.

राणा दांपत्यावर निशाणा
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सोमवारच्या भाषणात राणा दांपत्यावरही निशाणा साधला. “साधु संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी म्हण आहे. पण आमच्या घरात दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो साधु संत येतच असतात. शिवसेनाप्रमुख, माँसाहेब असतानाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात. पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडून काढायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याखेत समजावून सांगितलं आहे,” असा इशारा उद्धव ठाकरेंना यावेळी अप्रत्यक्षपणे राणा दांपत्याला दिला.

लवकरच घेणार सभा…
“लवकरच मी एक जाहीर सभा घेणार आहे. हल्ली सभेचं पेव आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे. जे नकली व तकलादू हिंदूत्ववादी आले आहेत, मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे आणि तो लवकरच घेणार,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. “करोना गेला असं वाटत आहे. पण जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्हीदेखील मास्क काढू नका. मास्कसक्ती नसली तरी अजून मास्कमुक्ती झालेली नाही,” असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.