महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकाबाजूला मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पण दुसऱ्या बाजूला पक्षातील नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. मुंबईत एका आंदोलना दरम्यान मनसेच्या दोन बडया नेत्यांमध्ये आपसात समन्वय आणि सामंज्यसाचा अभाव दिसून आला. नुकतेच तुरुंगातून सुटून आलेले मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी त्यांच्या भागातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी एल वॉर्डमध्ये पालिका अधिका-यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चर्चा सुरू असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भूमिका न पटल्याने संदीप देशपांडे तडक बैठकीतून निघून गेले. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर घडला. मुंबईतील एल वॉर्डात मनसेचे शिष्टमंडळ पालिका अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी वळूज नावाच्या अधिकाऱ्याने आपण या वॉर्डमध्ये नवीन असून तुमच्या समस्या लवकरच सोडवू असे आश्वासन दिले. पण देशपांडे यांना पालिका अधिकाऱ्याचे उत्तर पटले नाही.

त्यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी नांदगावकर यांनी वॉर्ड अधिकाऱ्याला थोडा वेळ दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. नांदगावकर यांची ही भूमिका संदीप देशपांडे यांना पटली नाही. पक्षाचे प्रमुख नेते आपली बाजू घेण्याऐवजी पालिका अधिकाऱ्याला साथ देत आहेत म्हणून ते बैठक सोडून तडक निघून गेले.

या प्रकारामुळे मनसेच्या नेत्यांमधले अंतर्गत मतभेद चव्हाटयावर आले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका जवळ येत असताना असे वाद मनसेला परवडणारे नाहीत. कारण २०१४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आज मनसेला दुसऱ्या फळीच्या नेत्यांची उणीव तीव्रतेने जाणवत असताना अशा वादांमुळे कार्यकर्त्यांचे आणखी खच्चीकरण होऊ शकते. संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर हे दोन्ही दक्षिण मुंबईतील नेते आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandip deshpande bala nandgaokar shown there diffrences in protest
First published on: 01-11-2018 at 15:55 IST