लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करणारे ठाण्यातील नेते स्थायी समितीतील ‘सामंजस्या’करिता एकमेकांच्या गळ्यात गळे घालू लागले आहेत. मनसेचे गटनेते सुधाकर चव्हाण यांची सभापतीपदी एकमुखाने निवड करताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाणे महापालिकेत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत असून स्थायी समितीतही शिवसेना-भाजप महायुती आणि आघाडीचे आठ-आठ असे समान संख्याबळ आहे. अतिशय चुरशीच्या निवडणुकीत मनसेला सहजासहजी पद देऊ नये, असे शिवसेनेतील एका गटाचे म्हणणे होते. मात्र, स्थायी समितीतील अर्थकारणावर आपली पकड रहावी, यासाठीच शिवसेना नेत्यांनी सुधाकर चव्हाण यांच्याकरिता पुढाकार घेत त्यांना अनुमोदन दिल्याने शिवसेना-मनसेतील छुपे राजकारण पुन्हा एकदा उघड झाले आहे.  
येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेच्या महापौर तसेच उपमहापौर पदाची निवडणूक होणार असून त्यासाठीच राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडीच्या गटात असलेल्या मनसेसोबत शिवसेनेने छुपा समझोता केल्याची चर्चा शहरात मोठय़ा चवीने चर्चिली जाऊ लागली आहे. या संदर्भात महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता, स्थायी समितीच्या निवडणुकीत वादविवाद तसेच घोडेबाजार होऊ नयेत, यासाठीच ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना बिनविरोध निवडून देण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.