हिंदी भाषेचा वापर वाढविण्यावर केंद्र सरकारने भर दिल्याच्या पाश्र्वभूमीवर विविध प्रादेशिक पक्षांनी त्याला विरोध सुरू केला असून, येत्या शनिवारी बंगलुरूमध्ये प्रादेशिक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीला मनसेलाही निमंत्रित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगलुरू मेट्रोमध्ये हिंदी भाषेचा वापर करण्यास ‘कर्नाटका रक्षका वेदिका’या कन्नड भाषकांच्या संघटनेने विरोध सुरू केला. या संघटनेच्या विरोधामुळे कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हिंदीचा वापर थांबवावा, असा आदेश दिला. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी मात्र हिंदीचा वापर करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनीही हिंदी भाषेचा वापर वाढविण्याची भूमिका मांडल्याने केंद्र सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप प्रादेशिक पक्ष किंवा संघटनांकडून केला जात आहे. तामिळनाडूमधील द्रमुकनेही हिंदीचा वापर करण्यास विरोध केला आहे.

या पाश्र्वभूमीवर कर्नाटक रक्षका वेदिका या संघटनेने येत्या शनिवारी बंगलुरूमध्ये प्रादेशिक पक्षांची बैठक आयोजित केली आहे. महाराष्ट्रात मनसेनेही हिंदीविरोधी भूमिका यापूर्वी घेतलेली असल्याने या संघटनेने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना विशेष निमंत्रण पाठविले आहे. मनसेने हे निमंत्रण स्वीकारले असून, मनसेचे नेते संदीप देशपांडे हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ही मनसेने आधीच भूमिका मांडली होती. बंगलुरूमध्ये होणाऱ्या बैठकीत मनसेची भूमिका मांडणार आहे.

संदीप देशपांडे, मनसे नेते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns will attend anti hindi regional parties meeting
First published on: 12-07-2017 at 03:38 IST