मुलुंडमधील आनंदनगर टोल नाक्यावर ‘टोल भरू नका’ छापलेले स्टिकर्स लावणा-या मनसे कार्यकर्त्यांना आज (शुक्रवार) मुलुंड नवघर पोलिसांनी अटक केली. कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, विभाग अध्यक्ष योगेश सावंत, सतिश नारकर, नगरसेविका वैष्णवी सिरफारे आदी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिल्यानंतरही, जोपर्यंत सरकार आश्वासनांची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत ‘टोल भरु नका’, असे आवाहन राज ठाकरे यांनी गुरूवारी केले होते. तसेच जबरदस्ती वसुली करणा-या कंत्राटदारांच्या घरी जाऊन आम्ही थैमान घालू असा खणखणीत धमकीवजा इशाराही त्यांनी दिला होता.