MNS Worker Assault Shopkeeper: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना आदेश देत असताना कुणालाही मारहाण करताना व्हिडीओ काढू नका, असे सांगितले होते. मात्र विरारच्या घटनेनंतर आता विक्रोळीतही एका दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण केली आहे. सदर दुकानदाराने व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी ही मारहाण करण्यात आली असून दुकानदाराची बाजारातून धिंडही काढण्यात आली.
विक्रोळीतील व्हिडीओ आता व्हायरल होत असून यावर टीका होऊ लागली आहे. सदर दुकानदार मारवाडी समाजातील असल्याचे सांगितले जात आहे. सदर दुकानदाराने व्हॉट्सॲपवर मराठी माणूस आणि महाराष्ट्राला उद्देशून आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. आज सकाळी मनसे कार्यकर्ते सदर दुकानदाराच्या दुकानात गेले आणि त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसबद्दल जाब विचारून मारहाण केली.
मनसेचे पदाधिकारी विश्वजीत ढोलम हे दुकानदाराला माफी मागायला लावून मारहाण करत असल्याचे आणि मार्केटमधून त्याची धिंड काढताना दिसत आहेत. या प्रकरणात अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.
या प्रसंगानंतर माध्यमांशी बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, आम्हाला कुणालाही आमची ताकद दाखवायची नाही. पण जर कुणी महाराष्ट्रात येऊन इथे पैसे कमावत असेल आणि मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा जाणूनबुजून अपमान करत असेल तर त्याला धडा शिकवला जाईल.
राज ठाकरेंचा मीरा-भाईंदर दौरा
२९ जून रोजी मीरा रोड येथे एका दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण केली होती. या मुद्दा देशभरात चर्चेला आला. ही मारहाण गुजराती व्यक्तीला झाल्यामुळे या प्रकरणाला गुजराती विरुद्ध मराठी असा रंग देण्याचा प्रयत्न झाला. यानंतर ५ जुलै रोजी मराठी विजयी मेळाव्यातही या घटनेचा उल्लेख झाला. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण करताना व्हिडीओ काढू नका, असे आवाहन केले होते. दरम्यान राज ठाकरे हे लवकरच मीरा रोड आणि भाईंदरचा दौरा करणार असल्याचे सांगितले जाते. ज्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती, त्यांची राज ठाकरे भेट घेणार असल्याची बातमी मुंबई तकने दिली आहे.